झाडाणीतील 640 एकर जमीन खरेदी करणाऱ्या GST अधिकाऱ्याच्या कारवाईची विजय वडेट्टीवारांकडून अधिवेशनात मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कांदाडी खोऱ्यात वसलेल्या झाडाणी या गावात गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याचे प्रकरण सातारा जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरून पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज मंगळवारी गौप्यस्फोट केला. “मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात झाडाणी गाव आहे. हे गाव आणि त्याच्या परिसरातील 640 एकर जमीन गुजरातमधील एका अधिकाऱ्याकडून अत्यंत माफक दरात खरेदी केली आहे. हा अधिकारी कोण आहे? गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार?” असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

मुंबईत आज अधिवेशनावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सातारा जिल्ह्यातील झाडानी गावातील जीएसटी आयुक्तांनी खरेदी केलेले जमीन प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात झाडाणी गाव आहे. हे गाव आणि त्याच्या परिसरातील 640 एकर जमीन गुजरातमधील एका अधिकाऱ्याकडून अत्यंत माफक दरात खरेदी केली आहे. हा अधिकारी कोण आहे? संबंधित अधिकारी हा गुजरातच्या जीएसटी विभागाचा प्रमुख आहे. त्याने कांदाडी खोऱ्यातील ही जमीन खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले.

जमीन खरेदीची कमाल मर्यादा पायदळी तुडवण्यात आली. तसेच या जमिनीसाठी रस्ते काढताना ते वनजमिनींमधून खोदून काढण्यात आले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने हे सर्व करण्यात आले. भागात रस्ते खोदताना महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. महसूल खात्याच्या मालकीच्या जमिनीतून हे रस्ते काढण्यात आले, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

जीएसटी अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार?

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुजरातच्या अधिकाऱ्याने जमीन खरेदी करताना महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला. एवढी मस्ती आणि दादागिरी…पर्यावरणीयदृष्ट्या हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. आम्ही जेव्हा पत्र पाठवले तेव्हा महुसल विभागाने थातुरमातुर उत्तर दिले. गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार? खेड आणि मावळच्या दोन प्रांतांचे अधिकार काढण्यात आले, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.