सातारा प्रतिनिधी | अजितदादा महायुतीत आल्यामुळे दुधात साखर पडली असल्याचं वक्तव्य माजी जलसंपदा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विजय शिवतारे यांनी साताऱ्यात केलं आहे. राजकारणात वेळोवेळी अनेक घटना, घडामोडी घडत असतात. परंतु, कुणी कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे अजितदादा पुरंदरला माझ्या प्रचारासाठी येतील, असंही शिवतारे यांनी सांगितलं.
अजित पवार कुटुंबावर २०१९ च्या निवडणुकीत केलेल्या वादग्रस्त टीकेवरुन विधानसभेला विजय शिवातारेंचा पराभव करण्याचा चंग अजित पवारांनी बांधला होता. यासंदर्भातील थेट आव्हानच अजित पवारांनी एका सभेमध्ये दिलं होतं. अजित पवारांवर टीका करणं ही आपली चूक होती, अशी जाहीर कबुली शिवतारेंनी दिली होती. एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा जेव्हा निवडणुकीला उभा असतो तेव्हा काही मर्यादा पाळायच्या असतात. त्या मी पाळल्या नाहीत, असं कार्यकर्त्यांसमोर बोलताना शिवतारे यांनी म्हटलं होतं.
शिवतारेंनी केलं अजितदादांचं कौतुक
आज अजितदादा महायुतीबरोबर आहेत. ते राज्यातील प्रमुख नेते आहेत. महायुतीतला प्रमुख पक्ष त्यांचा आहे. अतिशय धाडसी, निर्णय क्षमता असणारा त्याचबरोबर अंमलबजावणी करणारा एक नेता महायुतीमध्ये आल्यामुळे दुधात साखर पडली आहे, अशा शब्दांत विजय शिवतारेंनी अजितदादांचं कौतुक केलं.
सातारा लोकसभेची जागा शिवसेनेचीच
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना शिवतारे म्हणाले की, सातारा लोकसभा मतदारसंघ हा १९९६ पासून शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. एक अपवाद वगळता शिवसेनेकडेच ही जागा आहे. ही जागा शिवसेनेने मागावी, अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आपण ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. मात्र भाजप, शिवसेना अथवा अजितदादा गटाचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणणार असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली असल्याचं विजय शिवतारेंनी सांगितलं.
उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार
आपापल्या पक्ष आणि संघटनेसाठी उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, निर्णय घेण्याचा अधिकार हा वरिष्ठांना असतो. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची जी काही मतं आहेत, ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन, असं विजय शिवतारे यांनी स्पष्ट केलं.