कराड प्रतिनिधी | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे आणि अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी गुरुवारी कराड विमानतळास भेट दिली. विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडिंगची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा होता. विमानतळ परिसरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विमानतळ परिसरात स्थानिक स्वराज्य संस्थांनी कलर कोडेड झोनिंग मॅपची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
स्वाती पांडे आणि दीपक नलवडे यांनी विमानतळाची धावपट्टी व प्रशासकीय कार्यालयासह विमानतळ परिसराची बाहेरील बाजूने पाहणी केली. विमानतळ परिसरात कलर कोडेड झोनिंग मॅपचे उल्लंघन होत असून विमानतळ परिसरातील अनाधिकृत मोबाईल टॉवर, अनधिकृत बांधकामे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले. बेकायदा बांधकामांमुळे विमानतळास बाधा येण्याची शक्यता असून परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी याबाबत काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी यासंदर्भात कडक सूचना केल्या.
अनाधिकृत मोबाईल टॉवर, अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळास बाधा येण्याची शक्यता असून परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना स्वाती पांडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना केली. यावेळी तहसीलदार विजय पवार, अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबचे संचालक परवेज दमानिया, बेस इन्चार्ज पंकज पाटील, नितेश तिवारी, सीएफओ देशराज यांनी स्वाती पांडे यांचे स्वागत केले. व्यवस्थापक कृणाल देसाई, प्रभारी गटविकास अधिकारी विजय विभुते, ग्रामसेवक उपस्थित होते.