शिवाजी विद्यापीठातील ‘तो’ कार्यक्रम BJP की सामाजिक न्याय परिषदेचा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात रविवारी एक संस्था व विद्यापीठाच्या मार्फत सामाजिक न्याय परिषदेचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमावेळी काँग्रेस पक्ष व माजी खासदार राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी यांच्यावर काही जणांनी व्यासपीठावरून टीका करत कार्यक्रमास राजकीय स्वरूप दिले. यावरून कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना थेट निवेदन दिले असून विद्यापीठातील कार्यक्रम BJP की सामाजिक न्याय परिषदेचा होता? विद्यापीठाचा वापर राजकीय कारणासाठी होऊ नये, अशी मागणी केली असल्याची माहिती विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष अमित जाधव यांनी दिली.

विद्यापीठात घडलेल्या कार्यक्रमाबाबत सिनेट सदस्य व युवक काँग्रेस कार्याध्यक्ष अमित जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठात रविवार आयोजित कार्यक्रमावेळी सदर कार्यक्रम हा सामाजिक न्याय परिषदेचा होता. मात्र, त्याला राजकीय स्वरूप देण्यात आले. विशेष म्हणजे कार्यक्रमावेळी व्यासपीठावर कुलगुरू, प्र. कुलगुरू तसेच इतर अधिकारी उपस्थित असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. काहींनी यावर संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे संबंधित कार्यक्रम हा सामाजिक न्याय परिषद होती की? भाजपाची प्रचार सभा होती? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

आम्ही याबाबत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे ॲड. अजित पाटील व ॲड. अभिषेक मिठारी यांच्यासोबत नुकतेच निवेदन दिले आहे. शिवाजी विद्यापीठ हे अग्रगण्य व गुणवत्तापूर्ण विद्यापीठ असून त्याचा वापर राजकीय कारणासाठी होऊ नये. विद्यापीठ हे शैक्षणिक ज्ञानमंदिर असून गेल्या पाच दशकाहून अधिक कालावधीत लाखो विद्यार्थ्यांचा उद्धार विद्यापीठाच्या माध्यमातून झाला आहे.

विद्यापीठाच्या विविध सभागृहात विद्यापीठाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त इतर सामाजिक संघटनांचे कार्यक्रम होत असतात. पण त्याला राजकीय रंग नसतो. विद्यापीठाने राजकीय विचाराने प्रेरित कोणत्याच संघटनेला खतपाणी घालू नये. भविष्यात अशी चूक विद्यापीठात घडू नये व वैचारिक भान राखत शैक्षणिक वातावरणात राजकीय ढवळाढवळ करू नये, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.