पशुपालकांच्या उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेची पंचसुत्री; पशुवैद्यकीय अधिकारी गावोगावी जाऊन देणार सेवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने दरवर्षी एक वासरू जन्माला येणे, दुग्ध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थापासून उत्पन्नात वाढ करण्यासाठी पंचसूत्री राबविण्यावर भर दिला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कार्यक्षेत्रातील गावांत जाऊन सेवा देण्यासाठी सूचना केलेली असल्यामुळे शेतकऱ्यांनाही गतिमान सेवा मिळणार आहे.

जिल्ह्यात सध्या जिल्हास्तरीय १७१ आणि राज्यस्तर २२ असे एकूण १९३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पशुपालकांकडील पशुधनाची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. याअंतर्गत पशू प्रजनन, आरोग्य व्यवस्थापन, पशुधनासाठी चारा आणि पशुखाद्य या पंचसूत्रीवर भर देण्यात येणार आहे.

पंचसूत्रीनुसार दरवर्षी एक वासरू जन्माला येणे, दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थापासून उत्पन्नात वाढ करणे याबाबी राबविण्यासाठी मोठा वाव आहे. पंचसूत्रीची ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक गावात सेवा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवार आणि शनिवार दिवशी मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. इतर दिवशी या कार्यक्षेत्रातील इतर गावांत सेवा देण्यासाठी गाव भेट वार ठरवून तसे नियोजन करायचे आहे.

हे पशुवैद्यकीय अधिकारी आजारी जनावरांना औषधोपचार करण्याबरोबरच जनावरांना लसीकरण, कृत्रिम रेतन, जनावरांतील वंध्यत्व निवारण शिबिर घेणे, १०० टक्के जनावरांचे जंत निर्मूलन, पशुपालनातील पंचसूत्रीबाबत जागृती करतील. यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात दिली जाणारी सेवा आणखी चांगली आणि गतिमान होणार असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.