सातारा प्रतिनिधी | प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने ५८१ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयामार्फत सुरू केली असून नुकत्याच आलेल्या सहाव्या आणि सातव्या टप्यातील तपासणीचा अहवालामध्ये १२ शिक्षकांची प्रमाणपत्रे अयोग्य तर ११ शिक्षक तपासणीस गैरहजर होते.
पाच टप्प्यांत तपासणीत ६० प्रमाणपत्र अयोग्य ठरली होती तर २७ जण तपासणीस गैरहजर होते. त्यामुळे आतापर्यंत सात टप्प्यांत ३९० पैकी ३५२ शिक्षकांची तपासणी झाली आहे. यामध्ये ७२ शिक्षकांची प्रमाणपत्र अयोग्य आली असून ३८ जण तपासणीस गैरहजर होते.
प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी संबंधितांना निलंबनाची नोटीस बजावली असून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन याबाबत काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांमध्ये शिक्षकांनी अनेक सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासह अन्य आजारासंदर्भात प्रमाणपत्रे जोडली आहेत.
प्रशासनाकडे तक्रार आल्याने जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयात ५८१ शिक्षकांची पडताळणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ७९ पैकी ७५ शिक्षकांची तपासणी होऊन ५७प्रमाणपत्रे योग्य तर १२ अयोग्य ठरली होती. ४ शिक्षक तपासणीस गैरहजर होते. दुसऱ्या टप्प्यात ८३ पैकी ७६ शिक्षकांची तपासणी होऊन १३ अयोग्य ठरली होती.
७ शिक्षक गैरहजर होते, तिसऱ्या टप्प्यात ५३ पैकी ४९ शिक्षकांची तपासणी होऊन ११ अयोग्य ठरली होती. ४ शिक्षक गैरहजर होते. चौथ्या टप्प्यात ५५ पैकी ४९ शिक्षकांची तपासणी झाली. तीत ८ अयोग्य ठरली होती. ६ शिक्षक गैरहजर होते. पाचव्या टप्प्यात ५७पैकी ५१ शिक्षकांची तपासणी झली. १६ अयोग्य ठरली होती. ६ शिक्षक गैरहजर होते.
सोमवारी सहाव्या व सातव्या टप्यातील तपासणीचा अहवाल आला आहे. सहाव्या टप्यात २७ जणांना तपासणीसाठी बोलावले. त्यापैकी २४ जण हजर होते. त्यापैकी १८ योग्य, २ अयोग्य, ३ गैरहजर आढळले आहेत, सातव्या टप्यात ३६ जणांना तपासणीसाठी बोलावले होते. त्यापैकी २८ हजर होते. १३ प्रमाणपत्र योग्य, १० प्रमाणपत्र अयोग्य आढळून आली. ८ शिक्षक तपासणी गैरहजर होते.
सात टप्प्यांत ३९० शिक्षकांना तपासणीसाठी बोलावले. ३५२ शिक्षक तपासणीस हजर होते. २५६ प्रमाणपत्रे योग्य, ७२ प्रमाणपत्रे अयोग्य आली आहेत. ३८ शिक्षक गैरहजर होते. प्रमाणपत्र अयोग्य व गैरहजर शिक्षकांना शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी निलंबनाच्या नोटिसा बजावल्या आहेत. यातील काही शिक्षकांनी खुलासेही प्रशासनाकडे सादर केले असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.