सातारा प्रतिनिधी | येथील बसस्थानकासमोरील रस्त्यावर आज एका भरधाव चारचाकी वाहनाने पादचाऱ्यांना उडविल्याने एक जण जागीच ठार झाला, तर साडेतीन वर्षांच्या लहान मुलासह चार जण गंभीर जखमी झाले. भर गर्दीच्या रस्त्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.
राजेंद्र मोहिते, राजेंद्र बजरंग मोहिते (वय ५५, रा. सोळशी, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. शिवांश जालिंदर शिंगटे (वय साडेतीन, रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव), अक्षय नामदेव कदम (वय १६. रा. महाबळेश्वर एसटी चालक सीताराम संपत धायगुडे (वय ४७, रा. महाबळेश्वर) अविनाश शंकर केळघणे (वय ३१, रा. वारोशी, ता. महाबळेश्वर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहन चालक हसन जिन्नतसाहेब बोरगी (वय ४०, रा. कोरोची, ता. हातकलंगणे, जि. कोल्हापूर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, बसस्थानकाच्या समोर रस्त्यावर महाबळेश्वर येथून आलेल्या भरधाव वाहनाने (एमएच ०४ जीई ६६९५) रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार ठोकर मारत पुढे जात राहिली.
यात राजेंद्र मोहिते हे पादचारी जागीच ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते. महाबळेश्वरवरून दिशेने निघाले होते.