कराड प्रतिनिधी । सध्या महागाने पुन्हा आपले डोके वर काढले असून याचा सर्वसामान्यांना सर्वाधिक फटला बसला आहे. कालपासून एलपीजे गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून वाढलेल्या थंडीमुळे भाजीपाला काढणीस येण्याची प्रक्रिया मंदावल्याने आवक घटू लागली आहे. मागणी जास्त आणि आवक कमी अशा स्थितीमुळे भाजीपाल्याच्या दरातही वाढले आहेत. कराड शहरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रति किलो २० ते ३० रुपयाने दरवाढ झाली आहे. वाढलेला गॅसचा आणि भाजीपाल्याच्या दराचा परिणाम गृहिणीच्या स्वयंपाक घरात झाला असून महिनाभराची बजेट कोलमडले आहे.
हिवाळ्यात थंडीमुळे भाजीपाला काढणीस येण्याचा कालावधी वाढतो. पहाटे पडणाऱ्या दवामुळे फूल व कळी यांची वाढ मंदावते. थंडीमुळे रोग आणि किडींचे प्रमाण कमी होत असल्यामुळे हिवाळ्यात पिकांवर कीटकनाशक फवारण्या कराव्या लागत नाहीत. त्यामुळे या ऋतूतील भाजीपाल्याला चांगली मागणी असते. पावसाळ्यापासून टॉमेटोच्या दरात चढउतार सुरूच आहे. तर थंडीच्या सुरुवातीला भाजीपाला दर कडाडला आहे. वांगी, ढोबळी मिरची, कारले, दोडके, काकडी यांच्या दरात वाढ झालेली आहे.
हॉटेलमधून कांदा, टॉमेटो, बीटच्या ऑर्डर थंडीच्या सुरुवातीला दर वाढतात, त्यामुळे हॉटेल व्यवसाय करणारे सुरुवातीलाच भाजीपाला खरेदी करतात. तर काहीजण भाजी विक्रेत्यांना अगोदरच भाजीची ऑर्डर देऊन ठेवतात.
एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 डिसेंबर 2024 पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. ही वाढ फक्त 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी लागू आहे. पण घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
निवडणुकीत हॉटेल व्यवसाय गरम
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कराड शहरातील अनेक खानावळी फुल्ल असायच्या. तर हॉटेल व्यवसायही जोरात सुरू होता. यातून मोठी उलाढाल झाली आहे.
जोरदार पाऊस होऊनही भाज्या महाग का?
थंडीमध्ये भाजीपाला लागवड सुरू झालेली असते. यामुळे भाजीपाला आवक घटलेली असते. त्यामुळे जोरदार पाऊस होऊनही नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात भाज्या महाग झालेल्या आहेत.
खते, फवारणीचा खर्च आवाक्याबाहेर
दिवसेंदिवस खते व फवारणीचा तसेच मजुरीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. थंडीच्यानंतर आपल्या परिसरात अनेक शेतकरी भाजीपाला लागवड करतात, त्यामुळे दर कमी होतात. शासनाच्या अनुदानामुळे अनेक शेतकरी सिंचन पंप असल्याने थंडीच्या वेळेस भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करतात.
बाजारपेठेतील असे आहेत भाजीचे दर प्रति किलो
पावटा : १२० रुपये प्रति किलो
गवारी : १४० रुपये प्रति किलो
भेंडी : ८० रुपये प्रति किलो
हिरवी मिरची : ५० रुपये प्रति किलो
ढब्बू मिरची : ७० रुपये प्रति किलो
कांदा : ८० रुपये प्रति किलो
लसूण : ४०० रुपये प्रति किलो
बटाटे : ५० रुपये प्रति किलो
टोमॅटो : ४० रुपये प्रति किलो
बीट : १२० रुपये प्रति किलो
कोबी : ४० रुपये प्रति किलो
पालक पेंढी : २० रुपये प्रति किलो
वांगी : ८० रुपये प्रति किलो
प्लॉवर : ८० रुपये प्रति किलो