सातारा प्रतिनिधी | पुरोगामी महाराष्ट्रात समाजातील उपेक्षितांसाठी आजवर अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले आहेत. मात्र, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या ट्रान्सजेंडरना सरकार नोकरीत स्थान द्यायला अजुनही तयार नाही. याविरोधात लढा देत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या साताऱ्यातील तृतीयपंथी वीणा काशिदला एमपीएससीने नोकरी देण्यास नकार देत महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्वतःहून कोर्टात गेला आहे.
संग्राम-मुस्कान संस्थेनं तिच्या स्वप्नाला दिलं बळ
कराडची विद्यानगरी अर्थात सैदापूर गावच्या वीणा काशिदने पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पाहिले होते. सांगलीत वेश्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संग्राम-मुस्कान या संस्थेच्या मीना शिशू यांच्याशी वीणाने संपर्क साधला. वीणाची हुशारी पाहून त्यांनी एमपीएससीची तयारी करण्याचा सल्ला दिला. अर्थिक मदतही केली. त्यानुसार २०२३ मध्ये वीणा जळगावच्या दीपस्तंभ मनोबल स्पर्धा परीक्षा केंद्रात दाखल झाली. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करण्याचे ठरवले. परंतु अर्जात लिंग या रकान्यात मेल आणि फिमेल असे दोनच पर्याय होते. ट्रान्सजेंडरचा पर्यायच नव्हता.
एमपीएससीने अंतिम यादीतून नाव वगळलं
सर्वोच्च न्यायालय आणि कर्नाटक सरकारच्या निर्णयाच्या आधारावर वीणाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेत नोकर भरतीत ट्रान्सजेंडर हा पर्याय ठेवण्याची मागणी केली. मॅटने वीणाच्या बाजूने निकाल देताना अर्जात ट्रान्सजेंडर पर्याय ठेवण्याचे तसेच या वर्गासाठी स्वतंत्र मेरिट व आरक्षण देण्यास सांगितले. त्यामुळे वीणाला एमपीएससीची परीक्षा देता आली. पहिल्याच प्रयत्नात वीणाने एमपीएससी क्रॅक केली. एकूण तीन ट्रान्सजेंडरनी ही परीक्षा दिली. एकमेव वीणा काशिद उत्तीर्ण झाली. पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत असतानाच एमपीएससीने जाहीर केलेल्या अंतिम यादीत नाव नसल्याचे समजताच वीणाला धक्का बसला.
लोकसेवा आयोगाची न्यायालयात धाव
ट्रान्सजेंडरला पोलीस उपनिरीक्षक पदावर नेमणूक देऊ शकत नाही. त्यासाठी आरक्षणाची पॉलिसी बदलावी लागेल, या कारणावरून एमपीएसीनेच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता वीणाचा उच्च न्यायालयात लढा सुरू झाला आहे. सगळ्या देशात ट्रान्सजेंडरच्या हिताचे निर्णय होत असताना महाराष्ट्र सरकारने आमची फरफट सुरू ठेवली आहे. खरोखर महाराष्ट्र पुरोगामी आहे का, असा उद्विग्न सवाल वीणा काशिदने केला आहे.
आयटीआय इन्स्ट्रक्टर परीक्षेतही मिळवलं यश
तंत्रशिक्षण विभागाच्या वीजतंत्री (इलेक्ट्रीक इन्स्ट्रक्टर) पदासाठीची सरळसेवा भरतीची परीक्षाही ती उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नेमणूक मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. वीणा ही ट्रान्स वुमन आहे. सैदापुरातील भगवान काशिद यांच्या कुटुंबात जन्मलेल्या वीणाचं नाव विनायक होत. विनायक लहान असताना वडील गेले. दहावीत असताना आईचंही निधन झालं. भाऊ आणि बहिणीने आधार देत शिक्षणासाठी मदत केली. शिक्षण घेत असताना आपण वेगळे आहोत, असं त्याला जाणवायला लागलं.
लिंग बदलानंतर विनायकची झाली वीणा
कराडच्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये इलेक्ट्रीशियन डिप्लोमा करत असताना सतत विद्यार्थ्यांकडून हेटाळणी व्हायची. बायकी लक्षणे असल्याच्या टोमण्यांनी तो तणावाखाली असायचा. परंतु, भावंडांनी विनायकचे हे वेगळेपण मान्य केले. त्याला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. वाळवा तालुक्यातील साखराळे येथे आरआयटीमधून विनायकने एम. टेक. केले. २०१७ ते २०२२ या दरम्यान मुंबईत सलूनमध्ये काम केले. त्यानंतर विनायकने लिंग बदल करण्याचा निर्णय घेतला आणि विनायकची वीणा काशिद झाली. भविष्यात संधी मिळाली तर महाराष्ट्र पोलीस दलातील सेवेला आपले प्राधान्य असेल, अशी प्रतिक्रिया तिने दिली.