सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात तसे पाहिले तर अनेक ऐतिहासिक वस्तू, जुनी वृक्षे आणि सुदर अशी पर्यटन स्थळे आहेत. मात्र, जिल्ह्यातील एक असे गाव आहे कि, त्या ठिकाणी तब्बल साडेपाच एकर क्षेत्रात वडाचं झाड पसरलं आहे. दाट झाडी आणि चहूबाजूने जंगल. या जंगलात गेल्यावर आश्चर्य वाटतं त्याचं कारण म्हणजे हे जंगल फक्त वडाच्या झाडांच्या पारंब्यांनी भरलेलं आहे. असं म्हटलं जातं की 1880 सालापूर्वी एक वडाचं झाड होत आणि कालांतराने या एका वडाच्या झाडाचा पसारा असा फुलत गेला. हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील म्हसवे गावातलं.
साधारणतः पाचवडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं म्हसवे हे गाव लागत. टुमदार असलेल्या या गावाला तिन्ही बाजूने हिरवागार डोंगराने व्यापलंय आणि यातील एका डोंगराचा भाग म्हणजे वैराटगड. याच्याच पायथ्याला हे म्हसवे गाव वसलेलं आहे. गावाचं मूळ नाव तसं म्हसवे मात्र या व्यापक वडाच्या झाडामुळे या गावाला म्हसवे वडाचे म्हणून ओळखलं जातं. ब्रिटीश काळातील इंग्रज अधिकारी ली वॉर्नर यांनी पुस्तकात नोंद करत असताना आशिया खंडातील सर्वाधिक मोठे झाड म्हणून त्याची नोंद केली.
हे झाड म्हणजे जणू महाराष्ट्राचा हा एक अनमोल ठेवा आहे. मात्र, या अनमोल ठेव्याची किंमत प्रशासकीय यंत्रणेला आजपर्यंत नाही. ग्रामस्थ झटत आहेत मात्र त्यांना यश मिळत नाही. तर या वडाच्या जंगलात आल्यानंतर मन प्रसन्न होतं. मात्र या ठिकाणी असलेल्या अनावश्यक झुडपांमुळे आत जाता येत नाही. आत जाता येत नसल्यामुळे इथे आलेले पर्यटक नाराजीने परत जातात. ऐतिहासिक ठेवा असलेले हे वडाचे झाड सध्या वनविभागाच्या ताब्यात आहे.
वटपौर्णिमेला पूजन करण्यासाठी येतात पंचक्रोशीतील महिला
1882 साली ‘फ्लोरा ऑफ प्रेसिडेन्सी’ या पुस्तकात या झाडीची नोंद झाली. साडे पाच एकराच्या परिसरातील या वडाच्या झाडाचं मूळ झाड नष्ट झाल्याचं सांगितलं जातं. मात्र त्या नंतरही या झाडाचा विस्तार आजही थांबलेला नाही. आजही नवीन वडाची पारंबी तयार होऊन ती जमिनीत जात आहे. यातील अनेक झाडे ही गगनाला भिडली आहेत. त्याचे टोकही दिसत नाही. प्रत्येक वटपौर्णिमेला या ठिकाणच्या वडांच्या झाडांचे पूजन करण्यासाठी पंचक्रोशीतील महिला इथे येतात. असंख्य वड असल्यामुळे महिलांची आजिबात गर्दी होत नाही. आपल्याला आवडणाऱ्या झाडाचं गटागटाने पूजन करतात. या गगनचुंबी वडाच्या झाडाचे आजच्या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजन करणे आणि या वडांच्या पारंब्यांमधून वाट काढत फिरणे म्हणजे या गावातील सौभाग्यवतींचे भाग्यच.