Vasota Fort : वासोटा किल्ला पर्यटनासाठी झाला खुला; जल व जंगल सफारीचा घेता येणार अनुभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा (Vasota Fort) ट्रेक शुक्रवारपासून सुरू झाला असून याचा पर्यटक मनमुरादपणे आनंद घेत आहेत. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थान मानला जातो. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते. निबीड जंगल, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे.

वासोट्यावरुन दिसणारे उंचच उंच कडे अन् प्रचंड खोल दऱ्या मनात धडकी भरवतात. वासोटा पर्यटन सुरू झाल्यामुळे या भागातील मुनावळे, बामणोली शेंबडी, तापोळा, अंबवडे येथील येथील बोट क्लबच्या चालकांमध्ये तसेच स्थानिकांसह, तंबू व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पावसाच्या उघडीपीनंतर सह्याद्रीतील पर्यटनस्थळे पर्यटनासाठी खुली झाली असून यामुळे रोजगार व पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे.

सध्या पर्यटन विभागाच्या व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये पर्यटनासाठी नवीन संधी उपलब्ध होत असून याचा जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी नक्कीच फायदा होणार आहे.

वासोटा ट्रेकिंगसाठी महत्त्‍वाचे

वासोट्याला जंगल ट्रेकिंगसाठी जाताना बामणोलीवरून किंवा मुनावळे, दत्त मंदिर या ठिकाणांहून बोटीने जावे लागते. त्‍यानंतर वासोट्याच्या पायथ्याला पोचल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट जंगल असल्याने सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोचत नाहीत. त्‍यामुळे जमिनीची ओलही लवकर कमी होत नाही. त्यामुळे जळू (कानीट) चे प्रमाण जास्त असते. हा कीटक पायाला लागल्यावर रक्त पितो व पडून जातो; परंतु काही प्रमाणात हे कीटक विषारीही असू शकतात. जास्त प्रमाणावर रक्तस्राव झाल्यास जिवास धोका निर्माण होऊ शकतो. त्‍यामुळे वासोट्याला जाताना काळजी घेणे गरजेचे आहे, तसेच जळू लागल्यास मिठाचे पाणी, तंबाखू ओली करून त्यावर लावल्यास ती पडून जाते.

या ठिकाणाहून वासोट्याला जाता येणार

  • केदारेश्वर बोट क्लब, मुनावळे
  • भैरवनाथ बोट क्लब, बामणोली
  • ब्रविमश्वर बोट क्लब, शेंबडी
  • शिवसागर बोट क्लब, तापोळा
  • मौजे अंबवडे ता. जावली
  • तब्बल ४०० बोटींचा ताफा सज्ज

असे आहे वासोटा पर्यटन प्रवेश शुल्क

  • १०० रुपये प्रती व्यक्ती
  • १२ वर्षांच्या आत ५० रु.
  • गाईड २५० रुपये
  • बोट/वाहन शुल्क १५० रुपये
  • कॅमेरा शुल्क डीएसएलआर लेन्स कॅमेरा दर १०० रुपये,
  • साधा कॅमेरा, पॉईंट शूट कॅमेरा ५० रुपये