कराड विमानतळ हद्दीत एक रात्रीत उभा केला मोबाईल टॉवर; ग्रामपंचायतीकडून संबंधित कंपनीस कारणे दाखवा नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड येथील वारुंजी गाव परिसरातील विमानतळ सभोवताली असणाऱ्या बांधकाम प्रतिबंधित क्षेत्रात व विमानतळापासून 1 ते 2 किलोमीटर पेक्षा कमी अंतरामध्ये एका रात्रीत अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. या धक्कादायक घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. कराड विमानतळ कलर कोडेड झोनिंग नकाशाचे उल्लंघन करून व ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून न घेता सदरचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे अनधिकृतपणे मोबाईल टॉवरची उभारणी करणाऱ्या एका कंपनीस ग्रामपंचायतीच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित टॉवरची उभारणी करणापूर्वी या कामाबाबत काही तक्रारी ग्रामपंचायत कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याबाबत तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत कार्यालयाच्यावतीने दि. ०३/०२/२०२३ रोजीच्या पत्राद्वारे यापूर्वी कळविण्यात आलेले होते. कराड विमानतळाभोवती वारुंजी या गावात गट क्रमांक ८४० या जमिनीमध्ये ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून न घेता “मोबाईल टॉवर” उभारण्यात आल्याची तक्रार ग्रामपंचायत कार्यालयास दि. १४ जुलै रोजी प्राप्त झाली होती. या मोबाईल टॉवरमुळे विमानतळावरील विमान प्रशिक्षण केंद्राच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठीच्या विमानचलनामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

मोबाईल टॉवर उभारणी करण्यापूर्वी संबंधित व्यक्तींना प्रथम कराड कलर कोडेड झोनिंग नकाशाला अनुसरून उंची साठीचे “ना हरकत प्रमाणपत्र” महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून प्राप्त करून घेण्याच्या सूचना नियोजन प्राधिकारी यांच्यामार्फत दिले जाते. त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्रामध्ये अनुज्ञेय उंचीला अनुसरूनच बांधकाम करणेबाबत सक्त ताकीद दिली जाते. कराड विमानतळावरून विमानांच्या सुरक्षित उड्डाणांसाठी, विमानतळासाठीच्या कलर कोडेड झोनिंग नकाशामध्ये नमूद केल्यानुसार विमानतळ सभोवतालच्या बांधकामांची उंची नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. असे असताना देखील कराड विमानतळाभोवती १ ते २ किलोमीटर एवढ्या परिघात, ना हरकत प्रमाणपत्र न घेता काही बांधकामे होत असल्याचे निदर्शनास आले.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिसूचनेत काय म्हंटले आहे?

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिसूचना क्रमांक – जी. एस. आर. ७५१ (इ) दिनांक ३०/०९/२०१५ आणि जी. एस. आर. ७७० (इ) दिनांक १७/१२/२०२० यांचे व त्यामध्ये नमूद केल्यानुसार, कराड विमानतळ कलर कोडेड झोनिंग नकाशाचे काटेकोरपणे अवलोकन होऊन, त्यानुसार तुमच्या क्षेत्रातील बांधकाम परवानगी वितरीत करण्यात याव्यात. तसेच, सदर नियमांचे उल्लंघन होऊन जर बांधकाम होत असेल, तर अशा सर्व बांधकामांवर “महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६” मधील तरतुदींच्या आधारे आपले स्तरावरून योग्य ती कायदेशीर कारवाई तातडीने करण्यात यावी असे म्हंटले आहे.

विमानतळ परिसरात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यकच : कुणाल देसाई

याबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापक कुणाल देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, कराड विमानतळास २०२१ पासून कलर कोडेड मॅप लागू झाला आहे. त्यामुळे या परिसरात बांधकामे करताना संबंधित यंत्रणेची परवानगी घेणे बंधनकारक असल्याची माहिती त्यांनी दिली.

ग्रामपंचायतीच्या नोटीसीत नेमकं काय म्हंटलं आहे

ग्रामपंचायतीने बजावलेल्या नोटिशीत म्हंटले आहे की, ग्रामपंचायत वारुंजी हद्दीत गट नंबर ८४० मध्ये टॉवर उभा करणेस परवानगीसाठी ग्रामपंचायतीस संबंधिताने अर्ज दिला होता. परंतु आपण योग्य त्या प्राधिकरणाची परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही. तसेच विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घेतल्या शिवाय मोबाईल टॉवर उभारण्याचे काम करण्यात येऊ नये, अन्यथा
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५२ नुसार योग्य ती कारवाई केली जाईल. याची नोंद घ्यावी व सदरचे काम ताबडतोब बंद करण्यात यावे, अशा आशयाची नोटीस वारुंजी ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित कंपनीस देण्यात आली आहे.