सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीबरोबरच वंचित बहुजन आघाडी, आरपीआयने देखील निवडणुकीच्या आखाड्यात आपले उमेदवार उतरवले आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने सातारा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर करत शुक्रवारी वाई, पाटण आणि फलटणच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे वंचितचे आतापर्यंत जिल्ह्यातील सहा मतदारसंघाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. आता सातारा आणि कराड उत्तरचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वात अगोदर कोणी आपल्या उमेदवाराची घोषणा केली असेल तर तो वंचित बहुजन आघाडीने होय. या आघाडीने जिल्ह्यातील माणचा उमेदवार प्रथम जाहीर केला. माणमूधन इम्तियाज नदाफ यांना उमेदवारी दिल्यानंतर कोरेगाव मतदारसंघातून चंद्रकांत कांबळे आणि कराड दक्षिणमधून संजय गाडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, शुक्रवारी तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले असून यामध्ये वाई मतदारसंघातून अनिल लोहार, पाटण मतदारसंघात बाळासाहेब जगताप आणि फलटणला सचिन भिसे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. वंचितने आतापर्यंत जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर केले आहेत. आता सातारा आणि कराड उत्तरचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. वंचितकडे या दोन मतदारसंघासाठी अनेकांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यामुळे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.