सातारा प्रतिनिधी | भौतिक सुविधांचा विकास करताना आपणच पर्यावरणाची मोठी हानी करत आहोत. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करताना भावी पिढीला त्रास होऊ नये म्हणून शासन तसेच सामाजिक संघटना व ट्रस्ट यांच्या माध्यमातून वृक्षारोपण लावलेल्या वृक्षांचे संवर्धन अशी चळवळ गावोगावी उभी राहिली पाहिजे, असे प्रतिपादन गृहविभागाचे सहसचिव वैभव राजेघाटगे यांनी केले.
पुसेगाव, ता. खटाव येथून जाणाऱ्या सातारा- पंढरपूर (लातूर) या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा सुमारे १५ किलोमीटर अंतरात श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे ५ हजार वृक्षांचे रोपण करण्याच्या कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमास गृहविभागाचे सहसचिव वैभव राजेघाटगे यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी आमदार महेश शिंदे, संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे विश्वस्त शिवाजी मोरे, विभागीय वनाधिकारी हरिचंद्र वाघमोडे, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सपोनि संदीप पोमण, वारकरी गुरुकुलचे सुळ महाराज, ग्रामस्थ, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पुसेगाव पोलीस ठाणे, नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि युवकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सुरुवातीला पुसेगावातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर पुसेगाव ते वर्धनगड आणि पुसेगाव ते निदळ या रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, चिंच, करंज, लिंब तसेच अन्य वृक्षांची लागवड करून सामाजिक वनीकरण विभागाच्या उपक्रमाला देवस्थान ट्रस्ट सहकार्य करणार आहे. वनीकरण विभागाच्यावतीने वृक्षांच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असून या वृक्षांची जोपासना, निगा व जबाबदारी सक्षमपणे ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी ना. महेश शिंदे यांनी शासनाकडून सुमारे ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.