कराड प्रतिनिधी | एखादा भागीदारीतून व्यवसाय सुरू करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण या व्यवसायात विश्वासाला खूप महत्त्व असते. वाद आणि विवाद हे होतातच मात्र, समजुतीने घेतल्यास पुढे व्यवसाय सुरळीत चालतो. पण वाद झाले तर त्याचे पुढे गंभीर परिणाम देखील भोगायला लागतात. अशीच एक घटना कराड तालुक्यातील हनुमानवाडीत घडली आहे.
सुरुवातीला दोगदोघांमध्ये सुरू केलेला वडापावचा गाडा बंद केल्याचा राग मनात धरून एकाने हनुमानवाडी येथील घरात घुसून भागीदारासह त्याच्या पुतण्यावर चाकूने हल्ला केला. जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. तसेच भागीदाराच्या वडिलांनाही ढकलून दिले. यामुळे त्यांना दुखापत झाली. ही घटना बुधवार, दि. ३ रोजी कराड तालुक्यातील हनुमानवाडी येथे घडली.
याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी एकाला अटक केली आहे. जगन्नाथ राजेंद्र जाधव (रा. तळबीड ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दीपक किसन हत्ते (वय ४२, रा. हनुमानवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवार, दि. ३ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दीपक हत्ते घरातील वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये टीव्ही बघत बसले होते. तेव्हा जगन्नाथ जाधव याने घराच्या वरच्या गॅलरीतून घरात प्रवेश केला.
दोघांत सुरू केलेला वडापावचा गाडा बंद केल्याचा राग मनात धरून हॉलमध्ये बसलेल्या दीपक हत्ते यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दीपक यांच्या डावे दंडाजवळ, डोक्यात व पाठीवर चाकूने वार केला. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाले. यावेळी दीपक यांना सोडवण्यासाठी त्यांचा पुतण्या संकेत आला. त्याच्याही डाव्या दंडाजवळ व उजव्या मनगटावर जगन्नाथ याने चाकूने वार केला. त्याला गंभीर जखमी केले. तसेच या घटनास्थळावरून पळून जाताना दीपक हत्ते यांचे वडील किसन हत्ते यांना ढकलून दिले. यामध्ये वडिलांच्या पायास दुखापत झाली. या फिर्यादीवरून उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी जगन्नाथ जाधव यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. उंब्रजचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे तपास करत आहेत.