सातारा प्रतिनिधी । जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सातारा व जिल्ह्यातील ३२६ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांत १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांनी दिली.
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, ग्रंथ प्रदर्शन अशा चार भागात राबविण्यात येणार आहे. नवीन वर्षाची सुरूवात दि. १ जानेवारी २०२५ रोजी सार्वजनिक ग्रंथालये त्यांच्या कार्यालयात ग्रंथालय सभासदांच्या आवडीनुसार पुस्तकाचे वाचन करण्याचा सामूहिक उपक्रम राबविण्यात येणार आहे, शाळा, महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयातील विशिष्ट विषयावरील जसे स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाची पुस्तके, आरोग्य विषयक पुस्तके, ऐतिहासिक पुस्तके, विशिष्ट लेखकांच्या कथा, कादंबरी किंवा ग्रंथालयात उपलब्ध पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
निरंतर व सतत वाचनाची सवय लागावी यासाठी कोणती पुस्तके वाचन करावीत, कशी वाचावीत याबाबत मार्गदर्शन करणारी वाचन कौशल्य कार्यशाळा शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आयोजित करण्यात येणार आहे. स्थानिक लेखकांना ग्रंथालयात निमंत्रित करून वाचक व लेखक परिसंवादाचे आयोजन करुन वाचन संवाद करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे देखील जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. मंगलपल्ली यांनी सांगितले आहे.