पावसाळ्यात जनावरांना आजारापासून रोखण्यासाठी करा लसीकरण; पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पावसाळा सुरुवात झाली की साथरोगांमध्ये वाढ होते. पावसाळ्यात माणसांप्रमाणचे जनावरांनाही अनेक आजार होत असतात. त्यामुळे पशुपालकांना काळजी घ्यावी लागते. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या वतीनेही पशुधनाची काळजी घेण्यात येते. यासाठी जनावरांना लसीकरण करण्यात येते. सध्या जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम सुरू असून पावसाळ्याच्या काळात पशुधनासाठी हे लसीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.

पावसाळ्यात घटसर्प, फच्या यांसारख्या रोगांमुळे जनावरे मृत्युमुखी पडत असतात. या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास कमी वेळ मिळतो. त्यामुळे रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करणे महत्त्वाचे ठरत असते. सध्या जिल्ह्यात पशु संवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली असून यात सहभागी होण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने वातावरण अनेक सुक्ष्मजीवाणुच्या वाढीसाठी अनुकूल असते. परिणामी पावसाळ्यात विविध साथीच्या आजारांची लागण होते आणि त्याची तीव्रता जास्त झाल्यास जनावरे दगावण्याचा धोका सर्वाधिक असतो. ज्यामुळे त्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते. या बदलत्या वातावरणाशी सामना करण्यासाठी पावसाळ्यामध्ये पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी मान्सून पूर्व लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे : डॉ. दिनकर बोडरे

सध्या जिल्ह्यात घटसर्प, लम्पि या आजारावर असलेल्या लसींचे लसीकरण सुरु असून ८० टक्के हे लसीकरण पूर्ण झाले आहे. पशुपालकांनी आपले पशु घेऊन येऊन लसीकरण करून जाणे आवश्यक आहे. जेणेकरून जनावरांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा आजार उध्दभवणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावराचे लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले असल्याची माहिती पशु संवर्धन विभागाचे उपयुक्त डॉ. दिनकर बोडरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

जिल्ह्यात इतकी आहे गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आणि डुक्करांची संख्या

सातारा जिल्ह्यात सध्या पशु संवर्धन विभागाकडून जनावरांची लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून जिल्ह्यात लाखांच्या संख्येने जनावराची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर आढळतात. पशु संवर्धन विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार यामध्ये गायीची संख्या ३ लाख ५२ हजार ४३६, म्हैशी ३ लाख २६ हजार ८९६, शेळ्या ३ लाख ६४ हजार ३४८, मेंढ्या १ लाख ८५ हजार ९०५ तसेच डूक्कर ३१३ इतकी संख्या आहे.

लस कुठे उपलब्ध?

जनावरांसाठी लसीकरण करण्यासाठी लसीची उपलब्धता हि प्रत्येक शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात करण्यात आलेली असते. पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून नाममात्र किमतीत लस उपलब्ध करून दिल्या जातात.

आजारी जनावरांची काळजी कशी घ्याल?

आजारी जनावराला वेगळे ठेवावे. त्याला वेगळ्या भांड्यात पाणी आणि खाद्य द्यावे. आरोग्याचे विकार कमी करण्यासाठी स्वच्छ खाद्य, तसेच पाणी देण्याची गरज असते. रोगनिदान चाचणी परीक्षा करून योग्य औषधोपचार द्यावेत. नियमित जंतू निर्मूलन करावे. वेळेवर जनावरांना लसीकरण करून घ्यावे.

आजारी जनावरे कशी ओळखाल?

जनावर रवंथ करत नसेल, डोक्यांतून पाणी गळत असल्यास जनावर आजारी आहे, असे प्राथमिकदृष्ट्या ओळखावे. तसेच टाळी वाजविल्यानंतर किंवा हाकेनंतर प्रतिसाद देत नसेल, पाय ओढत चालत असेल तर ते आजारी समजावे.

कोणकोणती लस दिली जाते…

जनावरांना प्रामुख्याने घटसर्प, फऱ्या, आतरविषार, लाख्या खुरकत, देवी आदी प्रकारचे आजार होतात. या आजारांच्या लसी उपलब्ध आहेत.

पाच लाखांवर जनावरांना लस…

जिल्ह्यात जनावरांना आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लस देण्यात येते. जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. आतापर्यंत ५ लाख ३२ हजार पशुधनाला लस देण्यात आली आहे. सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे.