सातारा प्रतिनिधी | सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने रविवारी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत कोल्हापूरच्या उत्तम पाटील (वय २४) याने २१ किलोमीटर अंतर १ तास १३ मिनिटे ३२ सेकंदांत पूर्ण करून पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकविला; तर भंडाऱ्याच्या तेजस्विनी लांबकाने हिने १ तास २६ मिनिटे १८ सेकंदांत शर्यत पूर्ण करत महिला गटात अव्वल क्रमांक पटकविला.
सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित जाणाऱ्या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे. या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात पोलिस परेड ग्राउंड येथून सकाळी ६:३० वाजता झाली. खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर धावपटू मार्गस्थ झाले. देशभरातील सुमारे आठ हजार धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
पोलिस परेड ग्राउंड येथून सुरू झालेली स्पर्धा पारंगे चौक, पोवई नाका, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट व त्याच मार्गाने पोलिस परेड ग्राउंड येथे समाप्त झाली. स्पर्धेनंतर आयोजित कार्यक्रमात विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.