सातारा प्रतिनिधी । कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात अनेक भागांना आज अवकाळी पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील सातारा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने दुपारी हजेरी लावली. उकाड्याच्या वातावरणात पावसाच्या सरी बरसल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून अंगाची लाहीलाही होत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा चाळीशीच्या पार गेल्याने नागरिकांची अक्षरशः लाहीलाही सुरू आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आज जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह दुपारी पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी नागरिकांसह विक्रेत्यांची एकच तारांबळ उडाली.
तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण होऊन गेले होते. त्यामुळे अवकाळी पावसाने गारवा निर्माण केला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाई तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना सुद्धा घडल्या.
४१ अंशावर तापमान, पावसामुळे नागरिकांना दिलासा
सातारा शहरात सोमवारपासून पारा ४० अंशावर आहे. मंगळवारी ४०.३ अंश तापमानाची नोंद झाली. हे या वर्षातील उच्चांकी तापमान ठरले. तर बुधवारी ४०.१ अंश तापमान राहिले. सतत कमाल तापमान ४० अंशादरम्यान राहत असल्याने दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत रस्त्यावर तुरळक वाहने दिसतात. तसेच बाजारपेठेतही गर्दी जाणवत नाही. माण, खटाव, फलटण तालुक्यातील पाराही वाढला आहे. ४१ अंशावर तापमान जात असल्याचे दिसून येत आहे.
वीजपुरवठा खंडीत
साताऱ्यात पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. दरम्यान, कराडमध्ये कराडसह परिसरात सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास सुसाट्याचा वारा सुटून वातावरणात गारवा निर्माण झाला. तर बाणवाडी परिसरात वाऱ्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला.
विजांसह पावसाचा इशारा
दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. दरम्यान, हवामान विभागाने पुणे, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.