कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अवकाळी ढग दाटले असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास सातारा शहरात पावसाने हजेरी लावली. तर कराडला दुपारी अनेक ठिकाणीही अवकाळी पाऊस पडला. यामुळे दाट धुके निर्माण झाले होते. या धुक्याचा व ढगाळ वातावरणाचा पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
सातारा शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरुपात पाऊस पडला असलातरी हवेत गारवा निर्माण झाला होता. तसेच या पावसामुळे माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्यांवर परिणाम झाला. तर सकाळपासून दुपारी १२ पर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. त्याचबरोबर जिल्ह्याच्या अनेक भागातही हलक्या स्वरुपात अवकाळी पाऊस झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असतानाच ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच दाट धुकेही पडत आहे. याचा फटका अधिक करुन द्राक्षे, डाळिंबसारख्या फळबागांना बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. कारण, दीड महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊस होऊन बागांना मोठा फटका बसलेला. तशीच स्थिती आता निर्माण झालेली आहे. तर ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवरही धुके आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.