कराड प्रतिनिधी । सध्या कराड व पाटण तालुक्यात चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी त्यांच्याकडून कुठे घरफोडी तर कुठे लुटमारीचे प्रकार केले जात आहेत. दरम्यान आता चोरटयांनी आपला मोर्चा हा रस्त्याच्या बांधकाम साहित्याच्या चोरीकडे वळवला आहे. अशीच घटना नुकतीच कराड तालुक्यातील सुर्ली येथे घडली आहे. या ठिकाणी असलेल्या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयातून सुमारे 40 हजार रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य चोरटयांनी रातोरात लंपास केले. या प्रकरणी कराड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुर्ली ता. कराड गावच्या हद्दीत युनिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे ऑफिस असल्याने त्या ठिकाणी बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी ऑफिसमध्ये प्रवेश करीत बांधकामासाठी लागणारे अत्यावश्यक असलेले सुमारे ४० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.
याबाबतची फिर्याद कराड तालुका पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कराड तालुक्यात चोरट्याकडून महिनाभरात अनेक ठिकाणी चोरी करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या चोरटयांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.