लाईट जाताच चोरटयांनी घातला धुमाकूळ; 7 ठिकाणी दागिन्यांसह नवीन कपड्यांवर मारला डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात ग्रामीण भागात चोरटयांकडून सध्या चांगलाच धुमाकूळ घातला जात आहे. रात्रीच्यावेळी चोरट्याकडून रोकड, सोने चांदीच्या दागिन्यांसह नवीन कपड्यांवर डल्ला मारला जात आहे. अशीच घटना कराड तालुक्यातील येळगाव येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या ठिकाणी अज्ञात चोरटयांनी ७ ठिकाणी घरफोडी करुन रोकड, सोने चांदीच्या दागिन्यांसह नवीन कपड्यांवर डल्ला मारला. रात्रीच्यावेळी लाईट गेल्यामुळे अंधाराचा फायदा घेत चोरटयांनी पोबारा केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील येळगाव येथील सोने-चांदीचे व्यापारी वर्दीचंद नवलमन गांधी, झुंजार बाजीराव पाटील, डॉ. आनंदा बाळू सोरटे, तानाजी बापूराव मस्कर, पोपट गणपती पाटील, विजयकुमार भगवान पाटील, आनंदा राजाराम पाटील यांच्या घरांची समोरच्या बाजूने मुख्य दरवाजांची कुलुपे कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र, त्यापूर्वी शेजारच्या घरांमधील लोकांनी बाहेर येऊ नये म्हणून त्यांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर चोरटयांनी घरातील कपाटे, तिजोरीवर प्रहार करीत कपाटातील सोने-चांदीचे दागिने, रोकड तसेच मौल्यवान वस्तू घेऊन अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.

या घटनेची माहिती ग्रामस्थांकडून उंडाळे पोलिस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच घटनास्थळी कराड तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे, अर्चना शिंदे यांच्यासह श्वान पथक दाखल झाले आहे. विशेष म्हणजे घटना घडली त्यावेळी गावातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. त्‍यामुळे लाईट नेमकी वरून गेली होती, की चोरट्यांनीच वीजपुरवठा खंडित करून आपला कार्यक्रम पूर्ण गेला, अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.