सातारा प्रतिनिधी | सर्वाधिक काळ सरपंचपद भूषविण्याचा विक्रम तडवळे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथील झांजुर्णे कुटुंबाने केला आहे. या एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी तब्बल ५३ वर्षे तडवळे संमत कोरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काम पाहिले आहे. त्यामुळे या कुटुंबाची सर्वाधिक काळ सरपंचपद भूषविल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
झांजुर्णे कुटुंबाने सर्वाधिक काळ सरपंचपद भूषविल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली असून, त्यांना तशा नोंदीचे प्रमाणपत्र नुकतेच प्रदान केले आहे. हे प्रमाणपत्र नुकतेच मुंबई येथे देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत माजी सरपंच श्रीमंत सर्जेराव झांजुर्णे, माजी सरपंच मोनाली नीलेश झांजुर्णे यांनी स्वीकारले.
यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर, ॲड. नीलेश श्रीमंत झांजुर्णे, प्रा. सदाशिव शिर्के आदी उपस्थित होते. तडवळे संमत कोरेगाव ग्रामपंचायतीत माजी सैनिक (कै.) सर्जेराव ज्ञानू झांजुर्णे यांनी ग्रामपंचायत स्थापनेपासून म्हणजे १८ एप्रिल १९५२ ते २५ एप्रिल १९९१ अशी तब्बल ३९ वर्षे सरपंचपद भूषविले.
त्यानंतर त्यांचा मुलगा श्रीमंत सर्जेराव झांजुर्णे यांनी २४ जून १९९३ ते २३ जून २००३ असे दहा वर्षे सरपंचपदी सेवा केली. त्यानंतर त्यांची नातसून मोनाली नीलेश झांजुर्णे या २४ जून २०१८ ते एक जुलै २०२२ अशी चार वर्षे सरपंच होत्या. झांजुर्णे कुटुंबाने आपल्या ५३ वर्षांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात सर्व स्तरातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासात्मक, आध्यात्मिक, शेतीविषयक, पिण्याचे व शेतीचे पाणी याचे योग्य नियोजन केले.