साताऱ्यात ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये मांडला गोट्यांचा डाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाजवळील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी ऑल इंडिया पँथर सेनेकडून खड्ड्यांमध्ये ‘गोट्या खेळो’ आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाने वाहनधारकांचे लक्ष वेधून घेतले, शिवाय ते चर्चेचा विषयही ठरले.

पावसाळा सुरू झाल्यापासून सातारा शहर व उपनगरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची प्रचंड वाताहत झाली. रस्त्यांवर पडलेल्या महाकाय खड्यांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ते दुरुस्तीसाठी विविध संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिकेकडून खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, अजूनही काही ठिकाणचे खड्डे न बुजविण्यात आल्याने समस्यांचे ग्रहण काही सुटलेले नाही.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय जवळ असलेल्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावरून विद्यार्थ्यांसह दररोज हजारो वाहने ये-जा करतात. मागणी करूनही या रस्त्याची डागडुजी न करण्यात आल्याने मंगळवारी सकाळी ११ वाजता ऑल इंडिया पँथर सेनेकडून या खड्यांमध्ये ‘गोट्या खेळो’ आंदोलन करून बांधकाम विभागाचा निषेध नोंदविला. खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजवर अनेक आंदोलने झाली. कोणी खड्ड्यांमध्ये केक कापला तर कोणी वृक्षारोपण केले तर कोणी कागदी होड्याही सोडल्या. मात्र, मंगळवारी करण्यात आलेले ‘गोट्या खेळो’ आंदोलन नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरले.

या आंदोलनात ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड, जिल्हा महासचिव आशिष मोरे, सातारा शहराध्यक्ष सुशांत वायदंडे, जावळी तालुकाध्यक्ष आनंद कांबळे, अनमोल कांबळे, यश जाधव यांनी सहभाग घेतला.