कराड प्रतिनिधी | कराड नगरपालिकेच्या नगररचना कार्यालयात मोठा भ्रष्टाचार सुरू असून, त्यातील पाच अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा नगरपालिकेला टाळे ठोकू, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांची गाढवावरून धिंडही काढू, असा इशारा यशवंत विकास आघाडीचे गटनेते तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी दिलेला होता. त्यानुसार त्यांनी बुधवारी पालिकेच्या आवारात गाढव आणून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
यावेळी कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने इशारा दिलेले आंदोलन स्थगित झाले. पण, इशाराकर्त्यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या धिक्काराचा फलक बांधलेले चक्क गाढव पालिका परिसरात आणल्याने उपस्थित आचंबित झाले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नगररचना विभागातील स्वानंद शिरगुप्पे व सचिन पवार यांच्यावर कारवाईचा अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे नसल्याने त्यांचे तक्रार निवेदन नगररचना विभाग सातारा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले आहे. प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत तात्पुरती नियुक्ती असणारे रणजित वाडकर व शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ निलेश तडाखे यांना तातडीने तात्पुरते कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्याधिकारी खंदारे यांनी दिले.
दोन्ही अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत तोंडी सूचना दिल्या होत्या. तरीही आपल्या वर्तनात बदल झाला नाही. यशवंत विकास आघाडीने तक्रार दाखल केल्याने दोघांनाही तात्पुरते सेवा कार्यातून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले आहेत. तर नगरपालिका आस्थापनेवरील वामन संतोष शिंदे यांची बांधकाम विभागातून यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये बदली करण्यात आली आहे. राजपत्रित दोन्ही अधिकारी अगोदर वैद्यकीय रजेवर गेले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी खंदारे यांनी दिली.
राजेंद्र यादव यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना यशवंत आघाडीतर्फे निवेदन दिले होते. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नगररचना विभागातील दोन राजपत्रित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन चार जूननंतर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पालिकेतील अन्य विभागांबाबतही तक्रार असून पालिकेची खातेनिहाय चौकशी व लेखा परीक्षणाची मागणी पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे यशवंत विकास आघाडीने केली आहे. आम्ही केलेल्या मागण्यांवर तातडीने कारवाई झाल्याने टाळे ठोको आंदोलन स्थगित केले आहे.