सातारा प्रतिनिधी । सातारच्या नियोजित टेक्नॉलॉजी सेंटरसाठी आठ दिवसांत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिल्या आहेत. प्रस्तावास तत्काळ मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले.
सातारा येथे मध्यंतरी झालेल्या बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना नारायण राणे यांनी साताऱ्यात टेक्नॉलॉजी सेंटर सुरू करण्याची घोषणा केली होती. राज्यात उभारण्यात येत असलेल्या केंद्राचे हे उपकेंद्र असणार आहे. सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात अनेक सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग आहेत. उद्योगांना मनुष्यबळ पुरवणाऱ्या अनेक शिक्षण आणि तंत्रशिक्षण संस्था साताऱ्यात आहेत. त्यामुळे या केंद्रासाठी सातारा हे सुयोग्य ठिकाण ठरेल, अशी सूचना उदयनराजेंनी मांडली होती. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजेंनी नवी दिल्ली येथे राणे यांची भेट घेतली.
सातारा जिल्ह्यात टेक्नॉलॉजी सेंटर स्थापन केल्यास ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, विजेवर चालणाऱ्या वाहनांचे उद्योग, कृषीऔजारे उद्योग, कागद उद्योग आदी उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार होणार आहे. केवळ सातारा जिल्हाच नव्हे तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच उद्योगांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे हे सेंटर लवकरात लवकर मंजूर करावे, अशी विनंती उदयनराजेंनी राणेंना केली. त्यानुसार राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून सूचना केल्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून येत्या आठ दिवसांत प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यास सांगितले. केंद्र स्तरावर या केंद्राला तातडीने मंजुरी दिली जाईल, असे आश्वासनही राणे यांनी दिले.
‘मास’ला दिल्या शुभेच्छा!
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा यांच्या वतीने जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या औद्योगिक प्रदर्शनास लक्ष लक्ष शुभेच्छा. टेक्नॉलॉजी सेंटरबरोबरच साताऱ्यात ईएसआय रुग्णालय आणि ईपीएफ कार्यालय आणण्यासंदर्भात केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यामुळे औद्योगिक विकासास गती मिळेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.