कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर भाजपनं केलं लक्ष केंद्रीत; केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा शुक्रवारी कराडात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसह सर्वच राजकीय पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे भाजपच्या नेत्यांचे सातारा जिल्ह्यात दौरे वाढू लागले आहेत. आठवड्यात भाजपच्या दोन नेत्यांनी सातारा वकराड दौरा केला आहे. साताऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कराडात केन्द्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली आहे. यानंतर आता शुक्रवारी दि. 16 ऑगस्ट रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असूनत्यांच्या उपस्थितीत जनसंवाद मेळावा होणार आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जनसंवाद मेळावा पार पडणार आहे. एकंदरीत फडणवीस, मोहोळनंतर आता केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा हे कराडला येत असल्याने भाजपने कराड दक्षिणेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा हे येत्या शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.भाजप नेते अतुल भोसले यांच्या सातारा जिल्ह्यातील कराड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या जनसंवाद मेळाव्यातून विधानसभेचे रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल भोसले यांना ताकद देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार हे नक्की.

जिल्ह्यातील बड्या नेत्यासह तब्बल 5 हजार कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना साताऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी हा मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षातील नेते माणिकराव सोनवलकर यांनी आपल्या ५ हजार कार्यकर्त्यांसह आज भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सोनवलकर यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे.

जनसंवाद मेळाव्याला हे दिग्गज नेते राहणार उपस्थित

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या जनसंवाद मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह महायुतीचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. कराड दक्षिण मतदारसंघात यापूर्वी अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लढत दिली आहे, त्यामुळे मेळावे घेऊन ही जागा जिंकण्याच्या उद्देशाने भाजपने भोसले यांना पाठबळ देण्यास सुरुवात केली आहे.