राहुल गांधी म्हणजे खोटं बोलणारी फॅक्टरी, तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आज भाजपचे (BJP) महायुतीचे उमेदवार अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी सभेतून थेट खासदार शरद पवार, राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. “कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगाणाच्या निवडणुकीत काँग्रेसने आश्वासनांचे पेटारे उघडले आणि निवडणुका जिंकल्या. परंतु, आश्वासनं पाळली नाहीत. आता सांभाळून आश्वासने द्या, असं काँग्रेससारख्या राष्ट्रीय पार्टीचा अध्यक्ष असं म्हणत असेल तर ती पार्टी आश्वासनं पाळू शकते का? असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी ही खोटं बोलणारी फॅक्टरी आहे. तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा – महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विंग येथे आज केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, कृष्ण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, जिल्हाध्यक्ष श्री. धैर्यशील कदम, श्री. सुनील तात्या काटकर, श्री. विक्रम पावसकर, श्री. भारत पाटील, श्री. रविराज देसाई आणि महायुती व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित जनसमुदाय बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवारांवर सडकून टीका

शरद पवार या वयात देखील खोटं बोलतात. राज्यात गुंतवणूक आली नसल्याचे ते सांगत आहेत. वास्तविक देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली असल्याचं अमित शाहांनी ठणकावून सांगितलं. महायुतीच्या काळात समृध्दी महामार्ग, मेट्रो, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, महिला, शेतकरी, तरूणांसाठी योजना राबवल्या. त्यासारखं महाविकास आघाडीच्या काळातील एखादं काम शरद पवारांनी सांगावं, असं आव्हानही शाहांनी दिलं. युपीए काळात शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण केंद्रात मंत्री असतानाही महाराष्ट्रावर त्यांनी अन्यायच केल्याचा आरोपही शाहांनी केला.

प्रत्येक अग्निवीराला पेन्शनची नोकरी देणार

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार सभेत बोलताना अमित शाहा म्हणाले की, अग्निवीर ही तरूणांना बेकार करणारी नाही तर सैन्य दलाला तरूण करणारी योजना आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक अग्निवीराला परत आल्यानंतर केंद्र सरकार सीएपीएफ आणि महाराष्ट्र सरकार पेन्शनची नोकरी देईल. हे भाजपाचं आश्वासन आहे आणि मोदींची आश्वासनं फसवी नसतात. मोदी बोलतात ते करतात.

काँग्रेसचं आश्वासन मोदींनी पूर्ण केलं

दिवंगत इंदिरा गांधींनी ‘वन रॅंक, वन पेन्शन’ योजनेचं आश्वासन दिलं होतं. परंतु, चाळीस वर्षात काँग्रेसने ते आश्वासन पाळलं नाही. शेवटी नरेंद्र मोदींनी त्याची प्रत्यक्ष अमंलबजावणी केली. आमच्या आश्वासनांना काँग्रेसनं ‘चुनावी जुमला’ म्हटलं. परंतु, मोदींनी ती आश्वासने पूर्ण करून दाखवली. वन रॅंक, वन पेन्शन’ योजनेतून १ लाख ५५ हजार कोटी रूपये जवानांच्या कुटुंबांना दिले. आमची आश्वासने तुमच्या खटाखट, फटाफट सारखी नसतात, असा टोलाही शाहांनी काँग्रेसला लगावला.

अतुलबाबांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये आंतरराष्ट्रीय लेव्हलची इन्व्हेस्टमेंट करणार

अतुलबाबांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय लेव्हलची मोठी इन्व्हेस्टमेंट कराडमध्ये करणार आहे. राज्यात देखील युती सरकारने रस्त्याचे मोठे जाळे पसरवत विकास केला आहे. जलयुक्त शिवार,कृष्णा बिमा योजना, टेम्भू, म्हैसाळ योजना सारख्या अनेक लोकपयोगी योजना राबवत जनतेला सुख सुविधा देण्यावर राज्यातील युती सरकारने भर दिला आहे. लाडकी बहीण योजना राबवून बहिणींचा सम्मान केला आहे यापुढे लाडकी बहीण योजनेमध्ये वाढ होणार असून 2100 रुपये बहिणींना मिळणार आहेत असेही ते म्हणाले मागच्या निवडणुकीत अतुल भोसले अगदी थोडक्यात पराभूत झाले पण यावेळी मोठ्या फरकाने ते विजयी होणार आहेत. मुद्दामहून त्यांच्यासाठी मी आज आलो आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या विजयानंतर देखील विजयी सभा घेण्याकरिता मी पुन्हा नक्की येईन असे आश्वासन यावेळी अमित शहा यांनी दिले.

राम मंदिराचा विषय काँग्रेसनं लटकवत ठेवला

अयोध्येतील राम मंदिराचा विषय काँग्रेसनं ७५ वर्षे लटकवत, भटकवत ठेवल्याचा घणाघाती आरोप अमित शाहांनी केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अयोध्यामध्ये मंदिराचं भूमीपूजन करून थांबलो नाही, तर मंदिर बांधून दाखवलं. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर सर्व विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. ३७० कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आणला असला तरी राहुल गांधींची चौथी पिढीसुध्दा ३७० कलम पुन्हा लागू करू शकणार नाही, असा सज्जड इशाराच शाहांनी दिला.

मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार

जम्मू-काश्मिरमधील दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा पुरावा मागणाऱ्यांनी टीव्हीवर पाकिस्तानी नेत्यांची पडलेली तोंड पाहिली असती तरी पुरावे मिळाले असते, असा उपरोधिक टोला अमित शाहांनी राहुल गांधींना लगावला. तसेच मागील निवडणुकीत सेना-भाजप युतीलला बहुमत मिळालं होतं. परंतु, शिवसेनेनं जनादेशाला धोका दिला. हिंदुत्ववाद्यांना पाखंडी म्हणणाऱ्या, श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार जाऊन बसले, अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली.