सातारा प्रतिनिधी । हवामान संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडच्या काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून चांगले यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीच्या जोरावर हवामान विभागात भारत आत्मनिर्भर झाला आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जात आहे. हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाचा आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या अंदाजाचा देशभरातील शेतकरी आणि मच्छीमारांना फायदा होत आहे. गेल्या 9 वर्षात या क्षेत्रात भारताने अधिक चांगली कामगिरी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी केले.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू हे दोन दिवशीय सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून काल गुरुवारी पहिल्या दिवशी त्यांनी महाबळेश्वर येथील हवामान विभागाच्या ढग संशोधन केंद्रास भेट देऊन पाहणी केली. या भेटीनंतर येथील मेरीडीयन हॉटेल सभागृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, शास्त्रज्ञ डॉ. जी. पंडीथुराई व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, पूर्वी ढगांच्या संशोधनासाठी विमानाची मदत घ्यावी लागत होती परंतु महाबळेश्वरला मिळालेल्या नैसर्गिक उंची मुळे येथे ढग संशोधन केंद्राची उभारणी करण्यात आली त्यासाठी आता विमानाची मदत घावी लागत नाही. ढग फुटी, महापूर व दरड कोसळून होणाऱ्या आपत्तीची माहिती अगोदर मिळविण्यात अपयश येत आहे. भविष्यात या संदर्भात अधिकचे संशोधन करण्याची गरज आहे.
‘महाबळेश्वरप्रमाणेच महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा निसर्ग संपन्न आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. महाराष्ट्र देशातील एक श्रीमंत राज्य आहे. राज्यकर्त्यांनी मनावर घेतले तर मोठमोठे प्रकल्प बांधून पश्चिम घाटातील पावसाचे पाणी अडवून राज्यातील दुष्काळी भागाकडे वळविता येईल; परंतु राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. दोन-चारशे नव्हे तर लाख कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले पाहिजे. मात्र, राज्य सरकार अशा कामांवर पैसा खर्च करीत नाही. पश्चिम घाटातून समुद्रात वाहून जात असलेल्या पाण्याबाबतदेखील रिजिजू यांनी खंत व्यक्त केली.