सातारा प्रतिनिधी । लोणंद शहरातील नागरिकांच्या गैरसोयीचा प्रश्न आता सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लोणंद येथील सईबाई सोसायटीकडे जाणार्या रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करण्यात आले असून भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे.
हा भुयारी मार्ग ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. लोणंद रेल्वे स्टेशनमुळे शहराचे दोन भाग झाले आहेत, परंतु रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूस जाण्यासाठी योग्य मार्गाचा अभाव होता. आता रेल्वे मार्ग दुहेरी झाल्याने रेल्वे व मालगाडीच्या येण्या-जाण्याने वारंवार बंद होत असत, ज्यामुळे सईबाई हौसिंग सोसायटी, लोणंद बाजार समिती, आयटीआय, फुलेनगर, खोत मळा, भंडलकर वस्ती, माऊली नगर या भागातील नागरिकांना त्रास होत होता.
भुयारी मार्गाच्या कामासाठी माजी खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह निंबाळकर, ना. मकरंद पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर 64 कोटींचा निधी मंजूर झाला. या भुयारी मार्गाची रुंदी 15 फुट असेल, तर काही ठिकाणी 12 फुट आणि 9 फुट उंची असेल. भुयारी मार्गात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. नागमोडी वळणाचा हा रस्ता धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे तो सरळ पुणे-सातारा जोडावा, अशी मागणी होत आहे.