सातारा प्रतिनिधी । पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दारूच्या नशेत दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला सातारा जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी मोठा दणका दिला. अग्रवालच्या महाबळेश्वरातील एमपीजी क्लबच्या अनाधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवत अनाधिकृत १५ खोल्या जमीनदोस्त केल्या. या कारवाईमुळे महाबळेश्वरमध्ये अनाधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
प्रशासनानं हॉटेल केलं होतं सील
महाबळेश्वरमधील विशाल अग्रवाल यांचं अनधिकृत हॉटेल काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने सील केलं होतं. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार प्रशासनाने हॉटेलचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात केली. नी. साडे दहा पर्यंत प्रशासनाने हॉटेलच्या अनाधिकृत १५ खोल्यांचे बांधकाम पाडून तोडकामाची कारवाई पूर्ण केली. यावेळी प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
बिल्डर विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरातील एमपीजी क्लबच्या अनाधिकृत बांधकामावर हातोडा pic.twitter.com/8ZFKBpMOZo
— santosh gurav (@santosh29590931) June 8, 2024
मुख्यमंत्र्यांनी दिले होते कारवाईचे आदेश
बिल्डर विशाल अग्रवालच्या हॉटेलमध्ये अनियमितता असल्यास कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने तपासणी केली असता हॉटेलच्या बारमध्ये अनेक नियमांचे उल्लंघन झालं असल्याचे निशर्दनास आले. त्यानंतर हॉटेलचा बार आणि अनाधिकृत बांधकाम प्रकरणी संपूर्ण हॉटेलच सील करण्यात आलं होतं. आज अनाधिकृत बांधकामही पाडण्यात आलं.
हॉटेलच्या बारचा परवाना रद्द
एमपीजी क्लबमधील बार हा बिल्डर विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्रकुमार यांच्या नावे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलवर धाड टाकत बारचा परवाना रद्द केला आहे. तसेच या प्रकरणाचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बार देखील सील करण्यात आला होता.
भाडेपट्ट्यावरील जागेचा वाणिज्यिक वापर
लीजवरील एमपीजी क्लबच्या जागेचा वाणिज्यिक कारणासाठी वापर होत असल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. या क्लबला काही दिवसांपूर्वी प्रशासनाने टाळे ठोकले होते. तसेच अनाधिकृत असलेल्या १५ खोल्या जमिनदोस्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर शनिवारी सकाळी प्रशासनाने अनाधिकृत बांधकामावर बुललडोझर फिरवला.