सातारा प्रतिनिधी | महसूल विभागाने जिल्ह्यातील सर्व खाणींची माहिती घेत अनाधिकृत 43 क्रशर बंद केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच वडूज परिसरात अनाधिकृत वाळू उपसा प्रकरणी तलाठी व मंडलाधिकार्यांवर झालेलला हल्ला गंभीर असून यापुढे कोणत्याही विभागाबाबत असे कृत्य झाल्यास विविध कलमाखाली गुन्हे दाखल करुन अटक केली जाईल. गुंडागर्दी करुन कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणल्यास कुणालाच सोडणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, जिल्ह्यात 234 क्रशर सुरु असल्याची महिती मिळाल्यावर कायदेशीर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अनाधिकृत 57 क्रशर आढळून आली. पैकी 14 क्रशर नियमित करण्यात आले आली आणि उर्वरित 43 क्रशर बंद करण्यात आली आहेत. वडूज परिसरात बेकायदा वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. तलाठी व मंडलाधिकार्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन डंबर, जेसीबीवर कारवाई केली. मात्र संबंधित लोकांनी तलाठी व मंडलाधिकार्यांना मारहाण केली. ही बाब अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन काही जणांना अटक करण्यात आली आहे. इतर संशयितांचा शोध सुरु आहे.
जिल्हा प्रशासनातील कोणत्याही अधिकारी, कर्मचार्यांवर गुंडागर्दी करुन भ्याड हल्ले केल्यास कुणालाही सोडणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. सातारा हा शांत आणि क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात गुंडागर्दी अजितबात खपवून घेतली जाणार नाही. सर्व विभागांनी निर्भयपणे कामकाज करावे. चुकीचे काही सुरु असल्यास कारवाई झालीच पाहिजे. अनाधिकृत धंदे बंद करावेत, अन्यथा गुन्हे दाखल करुन दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
गेल्या पाच-सहा महिन्यांत बेकायदा वाळू, माती, मुरुम व डबर उत्खनन व वाहतूक प्रकरणी जिल्हा महसूल विभागाने विविध ठिकाणी 224 कारवाया करत 100 वाहने जप्त केली आहेत. तसेच संबंधितांकडून 9 कोटींचा दंड वसूल केला आहे. यावर्षी महसूल व गौण खनिजाची 100 टक्के वसुली केल्याची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.