सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शंभर टक्के मतदान पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद जिल्हा कक्षाने जोरदार जनजागृती मोहीम राबवून जिल्ह्यातील 1 लाख पंच्याहत्तर कुटुंबांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण कुटुंबाने मतदान करावे, असे आवाहन केले असल्याची माहिती स्विप कक्षाच्या नोडल अधिकारी तथा सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
स्विप कक्षाच्या नोडल अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनानुसार गुगल मीटच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उमेद अंतर्गत ग्रामीण भागात कार्यरत 2 हजार प्रेरिकांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधत मतदार जनजागृतीबाबत प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी मार्गदर्शन केले होते. यातून आणि मतदान शंभर टक्के होण्यासाठी कशा पद्धतीने कार्यवाही केली जावी याबाबत सविस्तर माहिती दिली होती.
या बैठकीत उमेद अभियानात कार्यरत प्रेरीकांनी गावोगावी प्रत्यक्ष गृह भेट घेऊन मतदारांना मतदान करणे विषयी समुपदेशन करणे बाबत आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत जिल्हा अभियान सहसंचालक विश्वास सिद व जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील 2 हजार प्रेरिकांनी दि. १५ ते १७ नोव्हेंबर रोजी अभियानांतर्गत स्थापित बचत गट, ग्रामसंघ व प्रभागसंघ यांच्या बैठकांचे आयोजन करून त्यामध्ये १०० % मतदारांनी मतदान करणेबाबत समुपदेशन केले.
या समुदाय स्तरीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मतदार जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आले. या संपूर्ण उमेद समूहाच्या जाळ्यातून जिल्ह्यातील एक लाख पंच्याहत्तर हजार कुटुंबाना प्रत्यक्ष गृह भेट देऊन समुपदेशन करण्यात आले. यावेळी संबंधित कुटुंबातील कुटुंब प्रमुखांनी आम्ही मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभागी होऊ, अशी ग्वाही दिली आहे. सदर मोहीम यशस्वी होणेसाठी जिल्हा व्यवस्थापक मनोजकुमार राजे, स्वाती मोरे, संजय निकम तसेच उमेद अभियानात कार्यरत सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी मेहनत घेतली.