कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील तासवडे येथील टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांकडून होत असलेल्या टोलवसुलीच्या विरोधात उंब्रजसह परिसरातील नागरिकांनी आज दुपारी खासगी चारचाकी, प्रवासी, मालवाहतूक वाहनांसह टोल नाक्यावर सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर वाहने उभी करुन आंदोलन केले.
टोल प्रशासनाने आडमुठी भूमिका न सोडता स्थानिकांची टोलवसुली सुरूच ठेवल्याने आज स्थानिकांनी वाहनांसह मोर्चा काढून टोल प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय शनिवार दि. ६ रोजी मार्केट कमिटीच्या हॉलमध्ये उंब्रज परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत घेतला होता. त्यानुसार रविवारी सकाळी ११ वाजता परिसरातील आंदोलक वाहनांसह एकत्र जमा होऊन तासवडे टोलनाका परिसरात मार्गस्थ झाले. टोलनाका परिसरात आंदोलक येताच पोलिसांनी सर्व वाहने अडवली व चर्चेसाठी बोलावले. यावेळी तासवडे टोलनाका व्यवस्थापक थोरात यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
स्थानिकांना टोल नाक्याच्या स्थापनेपासून सुरू असणारी टोलमाफी कायम ठेवावी या मागणीचे निवेदन टोल प्रशासनाला दिले. टोल आजपर्यंत दिला नाही, पुढेही टोल देणार अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. टोल प्रशासनाच्यावतीने व्यवस्थापक थोरात यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर उपस्थित होते. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तासवडे टोल नाक्यावर मागील आठ ते दहा दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या फास्ट टॅगमधून वाहनाने टोल परिससरात ये जा केल्यानंतर आपोआप पैसे कापले जात होते. यामध्ये फास्ट टॅग घरी असला तरी काहींना पैसे कट होऊन मेसेज आल्याने नाहक भुर्दंड बसू लागल्याने स्थानिकांत रोष निर्माण होऊ लागला होता. याबाबत ३० जून रोजी शिवसेना कराड उत्तर प्रमुख संजय भोसले यांनी लेखी निवेदन दिले होते.
उंब्रजचे सरपंच योगराज जाधव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ जाधव ,उंब्रज ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, उमेश काशिद, विलास आटोळे, शिवसेना कराड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले, कॅप्टन इंद्रजित जाधव, अमोल कांबळे तसेच उंंब्रज व परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना टोल व्यवस्थापक थोरात यांच्याकडे व्यक्त केल्या. थोरात यांनी याबाबतची सर्व माहिती कोल्हापूर येथील एनएचआय कार्यालयात दिली जाईल, शासनाने मानवरहित टोल ही संकल्पना अवलंबली असल्याने नवीन पद्धतीने केली जाणारी टोल वसुली यंत्रणा अवलंबली असल्याने स्थानिकांचा टोल कापला जात असून याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढून या अडचणीतून मार्ग काढणार असल्याची माहिती दिली.