कराड प्रतिनिधी | उंब्रज ते सासपडे मार्गावर मोटरसायकलवरून बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना उंब्रज पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी ८६ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रविवार दि. ३ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.
तानाजी मुरलीधर कमाणे (वय ४१) व हर्षद सुनिल जाधव (वय २१, दोघे रा. सासपडे, ता. जि. सातारा) अशी पोलिसांनी कारवाई केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उंब्रज ते सासपडे या मार्गावर बेकायदा दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र भोरे यांना मिळाली.
त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर यांना संशयित दारू तस्करावर वॉच ठेवण्याच्या सुचना देत उंब्रज ते सासपडे मार्गावर सापळा रचला. ठाणेकर यांच्यासह हवालदार संजय धुमाळ, प्रशांत सोरटे, श्रीधर माने, हेमंत पाटील यांनी पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर बोगद्यालगत
मोटार सायकलवरून दोन संशयित एक पोते घेवून जाताना दिसले. पोलिसांनी त्यांची कसून तपासणी केली असता, बेकायदा दारूसाठा सापडला. यावेळी पोलिसांनी सुमारे ८६ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून संशयितांना ताब्यात घेतले.