सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा झाली असताना देखील अजून सातारा लोकसभा मतदार संघात महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपकडून खा. उदयनराजे भोसले (Udyanaraje Bhosale) यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी खा. उदयनराजेंच्या समर्थकांनी केली आहे. या दरम्यान, भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नुकतीच साताऱ्यात खा. उदयनराजे यांची भेट घेत त्यांच्यापुढे एक प्रस्ताव देखील मांडला. मात्र, तो प्रस्ताव नाकारत आज खा. उदयनराजेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली.
मंत्री महाजनांनी आणलेला त्या प्रस्तावाला नकार देत नाराज झालेल्या खा. उदयनराजेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. या ठिकाणी त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेटही घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आहे. या भेटीवेळी अनेक विषयावर दोघांच्यात चर्चा झाली असून याची गुप्तता पाळण्यात आली आहे. तसेच या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती समोर आली नसली, तरीही सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ही भेट महत्वाची मानली जात आहे.
महाजनांची नेमकी कोणती होती ऑफर?
खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या चर्चेवेळी महाजनांनी उदयनराजेंना भाजपकडून एक ऑफर देण्यात आल्याचे सांगितले होते. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याचा पक्षाच्या वरिष्ठांचा निरोप घेऊन महाजन आले होते. मात्र, महाजनांनी दिलेला हा प्रस्ताव स्वीकारण्यास उदयनराजे भोसलेंनी नकार दिला.