सातारा प्रतिनिधी । सातारा विधानसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यसह वाई येथे गद्दारांना पाडा, असे खासदार शरद पवार म्हणाले होते. परंतु, सत्ता असल्यापासून गेली साठ वर्षे केवळ त्यांनी व काँग्रेसने घोषणाच केल्या. लोकांची कामे केलीच नाहीत. लोकांच्या भावनांशी खेळले, याच्यापेक्षा मोठी गद्दारी होऊ शकत नाही, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केली.
सातारा येथे अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रांवर खासदार उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, विनोद तावडे यांचे चारित्रहनन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे. एखाद्या रूममध्ये बसले असताना पैशाची बॅग ठेवून फोटो काढायचे, हे सगळे नियोजित आहे. राजकारणात अनेक वर्षांपासून असले प्रकार सुरूच आहेत. लोकांचा राज्यकारभारात सहभाग असावा, असे विचार मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव होते. त्यांनी लोकशाहीचा पाया रचण्याचे काम केले. त्यांना अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी राज्य झाले पाहिजे.
परंतु, स्वातंत्र्यानंतरच्या काळात सत्ताधारी काँग्रेसने फक्त अनेक घोषणा केल्या. घोषणा फक्त मते मिळवण्यासाठीच होत्या. त्यांच्या ६० वर्षाच्या काळात कोणतीही कामे झाली नाहीत की चांगली धोरणे राबवली गेली नाहीत. परंतु, लोकांना प्रगतीच्या मार्गाने जायचे आहे. हाताचा पंजा सत्ता असताना काही करू शकला नाही. तुतारीने केवळ पोकळ घोषणांचा गाजावाजा केला जात आहे. मशालवाल्यांना तर त्यांनी काय काम केलंय ते मशाल घेवून शोधावे लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला.