साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीबाबत खा. उदयनराजेंचे महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राजधानी साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारले जाणार आहे. हे स्मारक देशाला अभिमान वाटेल असे असेल. स्मारकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा असणार आहेच, तथापि स्मारक परिसरात संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि गुणवैशिष्ट्यांची म्युरल्स उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची बैठक जलमंदिर पॅलेस येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत उदयनराजे यांनी प्रस्तावित स्मारकाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी बैठकीस स्मारक समितीचे उपाध्यक्ष हरिष पाटणे, सचिव विलास शिंदे, विनोद कुलकर्णी, शरद काटकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, अमित कुलकर्णी, किशोर शिंदे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

खा. उदयनराजे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा आणि स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. स्मारकाचे आराखडे, संकल्पचित्रे याबाबत पालिकेने निविदा आणि अन्य स्पर्धात्मक किंवा प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवून, विशेष काळजीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला केल्या. प्रस्तावित स्मारक व त्याभोवतालचा परिसराबाबत नागरिकांनी आणि विशेष करुन इतिहासतज्ञांनी जरुर त्या सूचना कराव्यात. स्मारक समितीच्या बैठकीत आलेल्या सूचनांचा योग्य तो आदर राखला जाईल.