उंब्रजच्या उड्डाणपूल अन् खंडाळ्यातील पिकअप पॉईंटबाबत उदयनराजेंनी घेतली गडकरींची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान खा. उदयनराजेंनी ना. गडकरी यांची भेट घेतली. यावेळी सातारा जिल्ह्यातील महामार्गांच्या अडचणींबाबत चर्चा झाली. भेटीवेळी उंब्रज येथून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुलाऐवजी भागनिहाय पारदर्शी पूल उभारावा. खंडाळा, शिरवळ येथे रस्ता रुंदीकरणासह नवीन फ्लायओव्हर करावे. सेवा रस्त्यावर ड्रॉप अ‍ॅण्ड पिकअप पॉईंट करावा, अशी मागणी खा. उदयनराजेंनी केली. संबंधित अधिकार्‍यांना या मागण्यांची दखल घेण्याच्या सूचना ना. गडकरी यांनी दिल्या.

यावेळी गडकरी यांचे सहाय्यक दिपक शिंदे, अमोल बिराजदार, किल्ले प्रतापगड प्राधिकरणाचे सदस्य काका धुमाळ, अ‍ॅड. विनित पाटील, दिल्लीतील स्वीय सहाय्यक करण यादव उपस्थित होते. यावेळी खा. उदयनराजे म्हणाले, कराड तालुक्यातील उंब्रज हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे गाव आहे. उंब्रज येथे सुमारे 20 वर्षापूर्वी भराव पद्धतीचा फ्लायओव्हर बनवला आहे. त्यामुळे उंब्रज गावच्या ग्रामस्थांच्या व्यावसायिक आर्थिक उन्नतीवर विपरित परिणाम झाला आहे. उंब्रज ग्रामस्थांनी सेगमेंट पूल व नागठाणे ग्रामस्थांनी मोठा अंडरपास बांधण्याची मागणी केली आहे.

नागरिकांची गरज व व्यावसायिक दृष्टया ही कामे होणे महत्वाचे आहे. याचबरोबर सातार्‍याकडून पुण्याला जाताना पारगांव, खंडाळा आणि शिरवळ या ठिकाणी असणारे सेवारस्ते रुंद करणे आवश्यक आहे. येथील एमआयडीसी- पंढरपूर कडे जाणार्‍या वाहनांना मोठी कसरत करावी लागते. यामुळे याठिकाणी नवीन फ्लायओव्हर करावा. या ठिकाणी आत्ताच्या सेवा रस्त्यांचे नियमानुसार रुंदीकरण करण्यात येवून, पारगांव खंडाळा आणि शिरवळ येथे ड्रॉप अ‍ॅण्ड पिकअप पॉईंट शेडसह निर्माण करावेत, अशी मागणीही उदयनराजेंनी केली.

यावर गडकरी यांनी जाग्यावरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रजनीश कपूर यांना बोलावून उंब्रज येथील सेगमेंट पूल उभारण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच पारगांव-खंडाळा, शिरवळ येथील कामांबाबत अंशू मलिक, श्रीवास्तव, पुणे व कोल्हापूर येथील महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम व वसंत पंधारकर यांच्यासमवेत बैठक घेवून प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी उदयनराजेंना दिली.