सातारा प्रतिनिधी | सातार्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानाच्या व्यासपीठावरून भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीच्या घटक पक्षांनी मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार शड्डू ठोकला. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार घटक पक्षांच्या पदाधिकार्यांचा मेळावा जोरदारपणे झाला. या मेळाव्याने विरोधकांना आव्हान देत, राजकीय वातावरण ढवळून काढले. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वामुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावली आहे. त्यांच्या नेतृत्वाशिवाय सध्या भारताला पर्याय नाही. महाराष्ट्रातून 48 खासदार त्यांच्या विचारांचे असावेत, यासाठी महायुतीचे सर्व खासदार राज्यातून निवडून द्या, असे आवाहन केले.
उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे नेते डॉ. अतुल भोसले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी खा. उदयनराजे म्हणाले की, महाराष्ट्रात तिन्ही प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ कार्यकारिणींचे नेतृत्व जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहे. सातारा जिल्ह्यातही महायुतीचे घटक पक्ष आणि आम्ही जनतेला विकासाच्या माध्यमातून चांगले जीवनस्तर मिळावे, याकरिता प्रयत्न करत आहोत. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांनी लोकसभेचे यापुढील काम एकजुटीने करावे.