शरद पवारांना मोठा धक्का; बालेकिल्ल्यात उदयनराजेंनी फुलवलं कमळ; शिंदेचा पराभव करत झाले विजयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा महायुती भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पराभव करत विजय मिळवला.

सातारा लाेकसभा मतदारसंघात मतमाेजणीच्या पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या उदयनराजे भोसले यांनी 15 व्या फेरीत 9 हजार 736 मतांची आघाडी घेतली. उदयनराजेंना 4 लाख 79 हजार 304 मते तसेच शशिकांत शिंदेंना 4 लाख 69 हजार 568 मते मिळाली.

महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले पहिल्या फेरीपासून पिछाडीवर होते पुन्हा ते आघाडीवर आल्याने शिंदेंचे टेन्शन वाढू लागले होते. दरम्यान, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उदयनराजे भोसले यांनी विजयी मिळवल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत त्यांची विजयाची मिरवणूक काढली. शशिकांत शिंदे यांना 5 लाख 31 हजार 132 मते मिळाली आहेत. तर उदयनराजे भोसले यांना 5 लाख 63 हजार 167 मते पडली आहेत. 31 हजार 217 मतांनी आघाडी घेत उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत विजय मिळवला.

शिंदेंची मते कमी होण्यामागे हे एक कारण ठरले प्रमुख…

सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून 5 उमेदवारांनी माघार घेतलयाने महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 16 उमेदवार निवडणुकीत उभे होते. यामध्ये तब्बल दहा अपक्षांचा समावेश होता. सातारा लोकसभा निवडणुकीत प्रथम क्रमांकाची मते महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 5 लाख 68 हजार 749 मते तसेच शशिकांत शिंदेंना 5 लाख 36 हजार 475 मते मिळाली. दरम्यान, शिंदेंना मते कमी पडण्याचे कारण म्हणजे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात जावळी तालुक्यातील कुसुंबी येथील संजय कोंडीबा गाडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली असून त्यांना 36 हजार 559 इतकी मते मिळालेली आहेत.

सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला

पश्चिम महाराष्ट्रात प्रतिष्ठा आणि चुरशीच्या ठरलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजेंनी आमदार शशिकांत शिंदे यांना पराभूत करत आपणच सातारचे खरे राजे आहोत हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे भाजपला दुसऱ्या प्रयत्नात का असेना सातारा मतदारसंघात कमळ फुलवता आले, तर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी वाजलीच नाही. या पराभवाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला आहे.

साताऱ्यात भाजपचा पहिला खासदार

स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपला कधीच स्थान मिळाले नव्हते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा लोकसभेसाठी भाजपचा पहिला खासदार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील भाजपची वाढलेली ताकद आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत ही उदयनराजेंसाठी महत्त्वाची राहिली.

कार्यकर्त्यांकडून जलमंदिर बाहेर जल्लोष…

महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले पहिल्या फेरीपासून पिछाडीवर होते पुन्हा ते आघाडीवर आल्याने शिंदेंचे टेन्शन वाढू लागले होते. दरम्यान, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उदयनराजे भोसले यांनी विजयी मिळवल्याने त्यांनी मतांची आघाडी घेताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लाेष केला. सातारा शहर व परिसरात फटाके फाेडले. अनेकांनी गुलाल उधाळला. दरम्यान जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भाेसले यांचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन करण्यास प्रारंभ केला. यावेळी उदयनराजेंना अश्रु अनावर झाले. उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे यांनी त्यांना मिठी मारुन अभिनंदन करत सावरले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लाेष केला.

2019 मध्ये पोट निवडणुकीत झाला होता पराभव

2009 मध्ये उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांचा तब्बल 3 लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला होता. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष पुरुषोत्तम जाधवांना साडे तीन लाख मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. 2019 मध्ये शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा धुव्वा उडवून उदयनराजेंनी विजयाची हॅटट्रिक केली. मात्र अवघ्या 3 महिन्यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शरद पवारांच्या भर पावसातल्या सभेनं अख्ख्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बदलून टाकलं. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी भाजपच्या उदयराजेंना तब्बल 87 हजार मतांनी धूळ चारली होती.