कराड प्रतिनिधी । साताऱ्याचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यातील वाद सर्वपरिचित आहे. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो, असे भाजपचे खासदार उदयनराजे नेहमी उल्लेख करतात. त्या उल्लेखाप्रमाणे उदयनराजे यांनी आज तसे दाखवूनही दिले आहे. खासदार उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत अजितदादा आणि त्यांच्यातील वैरत्व विसरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी दूरध्वनी द्वारे त्यांना संपर्क करून त्यांचे स्वागत केले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याप्रमाणेच लवकरच अजितदादा यांची भेट घेऊन त्यांना भवानी तलवार आणि वाघनख देणार असल्याचे उदयनराजे यांनी साताऱ्यात म्हंटले होते.
त्यानंतर आज राज्याचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस असल्याने त्याचे औचित्य साधून उदयनराजेंनी दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु यातील अजितदादांना दिलेल्या शुभेच्छा महत्वाच्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी माता चरणी प्रार्थना, असे फेसबुक पोस्टमध्ये उदयनराजेंनी म्हंटले आहे.
अजितदादा आणि उदयनराजेंमधील वादाचे ‘हे’ होते कारण
2002 साली झालेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण बहुमत मिळाले नाही. मग काँग्रेसला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी अजितदादांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला सोबत घेतले. तेव्हा सातारा विकास आघाडीच्या 6 जागा निवडून आल्या होत्या. त्याकाळी तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या अजितदादा व उदयनराजेंची मैत्री सर्वदूर पसरली. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. तर उदयनराजेंचे उजवे हात सुनील काटकर हे जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती झाले.
प्रदीर्घ काळ अजितदादा व उदयनराजेंचा मैत्रीचा पेरा जिल्ह्यात सुरू होता. मात्र, नंतरच्या कालवधीत दोघांमध्ये अनेक कारणांवरून मतभेद सुरू झाले. मतभेदाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणांमध्येही झाले. कधी ही भांडणे रस्त्यात तर कधी विश्रामगृहावरही झाली. अजितदादा पवार व उदयनराजे भोसले यांच्यातला वाद राज्यभर गाजला होता. ज्या अजितदादांशी उदयनराजेंनी पंगा घेतला होता, त्याच उदयनराजेंना लक्ष्मणराव पाटील यांचे तिकीट डावलून शरद पवार यांनी तिकीट दिले होते. उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचे फारसे सख्य नव्हतेच. अजितदादा व उदयनराजेंच्या मतभेदाच्या काळात शरद पवार यांनी कधीच कुणाची बाजू घेतली नव्हती, अशी अनेक कारणे अजितदादा आणि उदयनराजे यांच्या वादातील आहेत.