सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीने आक्रमक प्रचाराला सुरूवात केली आहे. शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं आहे, तर महायुतीचे उमेदवार उदयनराजेंनी शरद पवार आणि उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या टीकेची झोड उठवली आहे. शरद पवारांनी लकी ड्रॉ काढून भ्रष्टाचार केलेला उमेदवार माझ्याविरोधात उभा केला असल्याची खरपूस टीका उदयनराजेंनी पाटखळ, शिवथर परिसरातील सभेत बोलताना केली.
उदयनराजे म्हणाले की, विकासकामे करण्यासाठी लोक उमेदवाराला निवडून देत असतात. मात्र, शरद पवार साहेबांनी माझ्या विरोधात लकी ड्रॉ काढून भ्रष्टाचार केलेला उमेदवार उभा केला आहे. लोकांची दिशाभूल करून त्यांनी आतापर्यंत सत्ता मिळवली आहे. विरोधी उमेदवाराच्या नेत्यांचे साम्राज्य साडेतीन जिल्ह्यात उरले आहे. त्यामुळे त्यांना घिरट्या घालाव्या लागत आहेत. शरद पवारांनी चारच नव्हे ४० सभा घेतल्या तरी मला काही फरक पडणार नाही.
लोकांची दिशाभूल करून विरोधी पक्षांनी आतापर्यंत सत्ता मिळवली. मात्र, सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांसाठी केला नाही, त्या उलट शेतकऱ्यांच्या मालकीचे असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना काँग्रेसने आयकर लावला. केंद्रातील भाजप सरकारने तो माफ केला, शेतकरी, वचित आणि महिलांना आधार देणाऱ्या सरकारला मतदारांनी खंबीर साथ देण्याचे आवाहन उदयनराजेंनी केले.
किरण साबळे पाटील म्हणाले, विरोधक वावड्या उठवत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. खासदार उदयनराजेंनी देश सांभाळावा तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी राज्याचे प्रतिनिधित्व करावे. सुजाण मतदार लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना खंबीर साथ देतील, अशी आम्हाला खात्री आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर साबळे, भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य गीतांजली कदम, उपसरपंच प्रकाश साबळे, राजेंद्र जाधव, लक्ष्मण पाटील, मंगल साबळे, प्रदीप साबळे, दत्तात्रय साबळे, जितेंद्र पिसाळ, सनी साबळे, सुजित साबळे, सर्जेराव साबळे, रयत क्रांतीचे प्रकाश साबळे, रूपाली शिंदे, विकास शिंदे, महेश साबळे, नीलेश नलावडे, डॉ. शशिकांत साळुंखे उपस्थित होते.