कराड प्रतिनिधी । विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी दि. 14 जुलै रोजी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुण शिवभक्तांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या घडलेल्या प्रकाराबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली आहे. ‘विशाळगडासंदर्भात काय घडले?, काय घडले नाही यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जितके गड – किल्ले आहेत. त्या ठिकाणी अतिक्रमण होता कामा नये, गडावर राहणारे जे गडकरी आहेत. ते सोडले तर बाकींच्यानी गडावर अतिक्रमण करण्याचा अधिकारच काय येतो? उद्या गडावर जाऊन कुणीपण अतिक्रम करतील त्याठिकाणी फाईव्हस्टार हॉटेल बांधतील,” असे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आज कराड येथे येऊन कराड शहरात उध्दभवलेल्या पाणी प्रश्नाबाबत तसेच पाणी पुरवठ्याच्या कामाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विशाळगडासंदर्भात काय घडले?, काय घडले नाही यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गड-किल्ले आहेत तेथे अतिक्रमण होता कामा नये. वर्षानुवर्षे जे गडावर राहणारे गडकरी आहेत, त्यांची घरे सोडली तर कोणीही तेथे अतिक्रमण करु नये.
उद्या गडावर जाऊन कुणीपण अतिक्रम करतील त्याठिकाणी फाईव्हस्टार हॉटेल बांधतील. अशा गोष्टींमुळे गड किल्ल्यांचे पावित्र्य राहणार नाही. गड-किल्ले हे सर्व पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतात. पुरातत्व खाते हे अवैध बांधकामाला परवानगी देईल का? मात्र, काहीही झाले तरी गड आणि किल्ल्यांवर कोणीही अतिक्रमण करुच नये, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी यावेळी म्हटले.