सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. काही पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढण्याबाबत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महत्वाचे विधान केले आहे. “लोकसभा निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काही अपवाद नाही,” असे खा. उदयनराजे यांनी म्हंटले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांना तुम्ही आव्हान देणार का? स असा माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता भोसले म्हणाले, “लोकशाही आहे, या लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. श्रीनिवास पाटील हे वयाने मोठे आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. त्यामुळे मी त्यांना आव्हान देण्याची भाषा करणार नाही. मला याबाबत फार बोलायचे नाही” शेवटी एकच सांगेन लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रत्येकाची इच्छा असते. त्याला मी अपवाद नाही., असे उदयनराजे यांनी म्हंटले.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून तीन वेळा खासदार राहिलेल्या उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर केवळ चारच महिन्यात राजीनामा दिला आणि २०१९ साली भाजपाकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. या निवडणूकीत त्यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. मात्र, आता आगामी निवडणुकीतही पुन्हा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपाचे उदयनराजे भोसले अशीच लढत रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे.