Udayanraje Bhosale : BJP च्या पहिल्या यादीत नाव न आल्याने खा. उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली उमेदवारी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 20 जणांचा समावेश देखील करण्यात आला. या पहिल्या यादीमध्ये सातारा लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे नाव असणार असा विश्वास खा. उदयनराजेंच्या समर्थकांना होता. मात्र, भाजपच्या पहिल्या यादीत खा. उदयनराजेंचे नाव नव्हते. शिवाय भाजपकडून उमेदवारी जाहीर केली जात नसल्याने खा. उदयनराजेंचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. “जर योग्य निर्णय झाला नाही तर एकमताने निर्णय घेऊ,” अशी भूमिका सुद्धा कार्यकर्त्यांनी मांडली. दरम्यान, भाजपकडून उमेदवारी जाहीर न झाल्याने निवडणूक लढणार का? या माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर आज खा. उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. “एवढंच सांगेन, मी काय संन्यास घेणार नाही,” असे त्यांनी म्हंटले.

सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपकडून खा. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारीबाबत कोणतीच घोषणा करण्यात आली नसल्याने आज माध्यम प्रतिनिधींनी साताऱ्यात खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “माझ्याकडे तिकीट आहे, प्लेन तिकीट आहे, ट्रेनचं तिकीट आहे, पिक्चरचं तिकीट आहे, बसचं तिकीट आहे, मात्र, इतर तिकिटाचं मला काही माहीत नाही… पण एवढच सांगतो मी काय संन्यास घेणार नाही.”

“पुढचा निर्णय काय असेल, याबाबत आताच बोलणं योग्य ठरणार नाही. फारच प्राथमिक स्टेज आहे. तीन पक्षांचं एकत्र सरकार आहे महायुतीचं. जागा वाटपात पुढे मागे होतंच. त्यांच्या त्यांच्या पक्षाचं. अजित दादा असतील, एकनाथ शिंदे असतील, भाजप असेल. प्रत्येकाला वाटतं, त्यांना तिकीट मिळालं पाहिजे.त्यात काही चुकीचं नाही. ठरेल त्यावेळी बघू” अशी प्रतिक्रिया यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी दिली.