सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत विराट शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. जलमंदिर पॅलेस येथून बैलगाडीतून येवून ते महारॅलीत सहभागी झाले. बैलगाडीचा कासरा खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजेंच्या हाती होता. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ‘घोटाळे दाबण्याचा हाच का यशवंत विचार’, असा उपरोधिक सवाल उदयनराजेंनी शरद पवारांना केला.
उमेदवारी अर्ज भरताच उदयनराजेंचा पवारांवर निशाणा; म्हणाले, घोटाळे दाबण्याचा हा कसला यशवंत विचार… pic.twitter.com/ffaBFIeRxL
— santosh gurav (@santosh29590931) April 19, 2024
महारॅलीत मुख्यमंत्र्यांसह ‘या ‘ दिग्गजांची उपस्थिती
खा. उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, माथाडी नेते आ. नरेंद्र पाटील, माजी आ. मदन भोसले, दमयंतीराजे भोसले उपस्थित होत्या. गांधी मैदानपासून महायुतीच्या रॅलीला सुरुवात झाली. मोती चौक, देवी चौकमार्गे शेटे चौकातून रॅली पोलीस मुख्यालयमार्गे पोवई नाक्यावर आली. यावेळी प्रमुख नेत्यांनी छ. शिवाजी महाराज, दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि डॉ. बाबासाहेब आआंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाउन उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारच्या विकासाच्या मुद्यावर भूमिका मांडून उदयनराजेंना मताधिक्क्याने विजयी करण्याचं आवाहन प्रमुख नेत्यांनी केलं.
घोटाळे दाबणाऱ्यांचा हा कसला यशवंत विचार
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासह शरद पवार यांच्यावर खरपूस टीका केली. ज्यांनी घोटाळे केले आहेत, त्यांना माझ्या विरोधात लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यशवंत विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनी या उमेदवारासाठी जिल्ह्यात चार सभा घेतल्या आहेत. घोटाळे दाबण्याचा हाच का यशवंत विचार, असा खोचक सवाल खासदार उदयनराजेंनी शरद पवारांना केला.
यशवंत वारसा सांगणाऱ्यांकडून घोटाळा करणाऱ्याला उमेदवारी
उदयनराजे म्हणाले की, काही लोक विनाकारण माझ्याच विरोधात प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोटाळा करणाऱ्या संचालकाला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. हा घोटाळा पूर्वीचा आहे. तो आम्ही उकरून काढलेला नाही. विरोधी उमेदवाराच्या म्हणण्यानुसार आम्ही रडीचा डाव खेळत नाही तर त्या उमेदवारानेच उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात संबंधित घोटाळ्याच्या गुन्हयाची माहिती नमूद केली आहे. या संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
पुराव्याशिवाय गुन्हा दाखल होतो का?
कोणाविरुद्ध पुरावा असल्याशिवाय गुन्हा दाखल करायला पोलीस प्रशासन मूर्ख नाही. त्यामुळे आ. महेश शिंदे, नरेंद्र पाटील यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदारसंघात प्रचाराला फिरायचे आहे. त्यामुळे जामीन द्यावा, कारवाईत थांबवावी, अशी मागणी तुतारीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी केली असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. आपल्या विरोधातील उमेदवार माथाडी कामगारांच्या विषयात देखील घोटाळा करत असल्याचा आरोपही उदयनराजेंनी केला. घोटाळ्याचे सत्य समोर आले आहे आता विरोधी उमेदवाराने आपला शब्द पाळावा. आता यशवंत विचारांचा वारसा सांगणारे नेते त्यांना कव्हर करत असतील तर ते फार मोठे दुर्दैव असल्याचा टोला देखील उदयनराजेंनी लगावला.