सातारा प्रतिनिधी | उमेदवारी संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून बसलेले खासदार उदयनराजे भोसले आज साताऱ्यात आगमन झाले. जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या पुलावर राजे समर्थकांनी जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तसेच एक लाख फुलांचा तयार करून आणलेला हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर 5 जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. त्याचबरोबर तीनशे किलो व वीस फूट लांबीचा पुष्पहार क्रेनच्या साह्याने घालण्यात आला. शिरवळमधील नीरा नदीच्या पुलावर उदयनराजेंचं आगमन होताच समर्थकांनी ‘एक नेता, एक आवाज… उदयन महाराज, उदयन महाराज..’, अशी घोषणाबाजी केली.
उदयनराजेंच्या स्वागतासाठी सातारा आणि परिसरातील उदयनराजे समर्थक जय्यत तयारी करत होते. जेसीबी , क्रेन, एक लाख फुलांच्या हाराची समर्थकांनी ऑर्डर दिली होती. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाहांशी भेट उदयनराजेंची भेट झाली. अमित शाहांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिल्याचे संकेत मिळताच राजे समर्थकांमध्ये उत्साह संचारला होता.
अजित पवार यांनी सातारा लोकसभेच्या उमेदवारीवर दावा केला होता. त्यामुळे महायुतीत भाजपाची आणि खासदार उदयनराजे भोसले यांची देखील कोंडी झाली होती. मात्र आता ही कोंडी फुटली असल्याचे एकंदरीत संकेत मिळू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील मी निवडणूक लढणारच असा निर्धार उदयनराजेंनी बोलून दाखवला आहे त्यावरून महायुतीचे तेच उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब होतंय.