सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवराय हे युगपुरुष असून, त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा पाया रचला. अशा युगपुरुषाविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. अशी माणसं लोकशाहीच्या प्रक्रियेत आली तर भारताच्या लोकशाहीला धोका उद्भवू शकतो, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
राहुल गांधी यांनी समाज माध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर या निवासस्थानी आज गुरुवारी दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समाचार घेतला. यावेळी उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांनी लोकशाहीचा पाया रचला. सर्वधर्म समभाव ही शिकवण त्यांनी दिली. घरोघरी त्यांना दैवत म्हणून पूजले जाते. असे असताना भ्रमिष्ट व क्रियानिष्ठ असलेल्या राहुल गांधी यांनी शिवरायांबद्दल समाज माध्यमांवर मांडलेले मत अत्यंत निंदनीय आहे.
ज्यांना युगपुरुषांची कोणतेही माहिती नाही, स्वतःची विचारधारा नाही असा व्यक्ती एखाद्या पक्षाचे नेतृत्व कसे काय करू शकतो? अशा व्यक्तींना महाराष्ट्र व देशाच्या जनतेने धडा शिकवावा, कारण असाच पायंडा जर पुढे पडत गेला तर तो देशासाठी हितकारी ठरणार नाही. आपण या संदर्भात संपूर्ण माहितीची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहोत. या वक्तव्याचा सर्व पातळीवर निषेध झाला पाहिजे. दरम्यान, महापुरुषांवर केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत कठोर कायदा करावा, अशी मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.