सातारा प्रतिनिधी । सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज साताऱ्यात पार पडली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. ‘यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जिल्हा ठामपणे म्हणणाऱ्यांचं काय झालं? यशवंतराव चव्हणांच्या विचारांचं काय झालं? सगळी कामं मार्गी लावण्याचं काम महायुतीनं केलं आहे. महायुतीच्या पत्रकार परिषदेत रिपोर्टकार्ड दिलं असं या अगोदरच्या सरकारनं जाहीर केलं का? मराठा आरक्षणाबाबत तुम्ही बोलला नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही पहिल्या पासून सगळं पाहत आहात. आरक्षणावर तुम्ही तेव्हा का बोलला नाही? आता सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
साताऱ्यात पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीनंतर खा. उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, “शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ आहेत. एवढे वर्ष हातात सत्ता होती मुख्यमंत्री होता. मग त्यांनी त्या काळात ती काम मार्गी लावली नाहीत. तुम्ही का कामं केली नाहीत? तुम्ही माणसांना वंचित ठेवलं, लोकांना सधन होऊ दिलं नाही.
‘व्हीपी सिंग सरकारणं मंडल आयोग लागू केल्यानंतर तुम्ही त्यावर बोलला नाहीत. तेव्हा जाळपोळ भोकसा भोकसी सुरू होती. मग तेव्हा काहीच का केलं नाही. मराठा आरक्षणाबाबत तुम्ही भाष्य केलं नाही. मराठ्यांसह आर्थिक दृष्ठ्या दुर्बल आहे. त्या सगळ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण तुम्ही फक्त बॅकवर्ड क्लाससाठीच केलं, असा आरोप उदयनराजेंनी केला.
महायुतीच्या उमेदवारासाठी आपण राज्यभर फिरणार?
‘आम्ही दोघांनी महायुतीच्या माध्यमातून विकास कामे केली आहे. त्यांनी याच विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जाणार आहे. भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी जिल्ह्यात फिरणार.अगदी महाराष्ट्रात फिरण्याची वेळ आली तरी फिरणार. महायुतीचे आमदार महाराष्ट्रात निवडून येणार असा मला विश्वास आहे. लाडकी बहिण योजनेवर टीका केला जात आहेत. सध्या त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. या सरकारच्या माध्यमातून योजना मार्गे लागल्या या त्यांनी का मार्गी लावल्या नाहीत. स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याने केलं तर ते बघवत नाही. नाव ठेवण्यापलीकडे यांना काही जमत नाही, असा टोलाही उदयनराजेंनी विरोधकांना लगावला.